गहू पिकावरील तांबेरा (गंज रोग) नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
गहू पिकावर तांबेरा (गंज रोग) हा एक गंभीर बुरशीजन्य रोग असून, वेळेवर उपाययोजना न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खालील प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत.
प्रतिकारक वाणांचा वापर
◼️ गहू पिकावर तांबेरा रोग टाळण्यासाठी प्रतिकारक वाणांची निवड महत्त्वाची आहे.
◼️ 'फुले समाधान', 'फुले अनुपम', 'HD 2189', 'पुण्या', 'परभणी-५१', 'त्र्यंबक', 'गोदावरी', 'तपोवन' आणि 'शरद' हे वाण तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याने त्यांचा वापर करावा.
लक्षणे दिसताच फवारणी
◼️ पानांवर नारंगी किंवा काळ्या रंगाचे ठिपके दिसू लागताच बुरशीनाशकांची फवारणी सुरू करावी.
◼️ तांबेरा रोगाची लक्षणे आढळताच त्वरित फवारणी करणे आवश्यक आहे.
◼️ यामध्ये टेबुकोनाझोल ५० टक्के ट्रायफ्लोक्सीस्ट्रोबिन २५ टक्के डब्ल्युजी हे बुरशीनाशक ६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.
◼️ तसेच मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी किंवा झिनेब ७५ टक्के डब्ल्युपी हे बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येते.
◼️ याशिवाय प्रवायकोनाझोल २५ टक्के एसी (९० मिली), क्रेसॉसिम मिथाइल ४४.३ टक्के एससी (१० मिली) किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी (३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक वापरण्याचा सल्ला दिला आहे.
◼️ रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी घ्यावी.
इतर उपाययोजना
◼️ रोगग्रस्त पाने त्वरित काढून नष्ट करावीत.
◼️ शेतीत पाण्याचा अतिवापर टाळून योग्य जलनियोजन ठेवावे.
◼️ तसेच पेरणीपूर्वी गांडूळ खत किंवा सेंद्रिय खतांचा वापर केल्यास पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
◼️ पाणी मर्यादित स्वरूपात आवश्यकतेनुसार द्यावे.
◼️ शेतात अतिरिक्त ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
या उपाययोजना वेळेवर, योग्य मात्रेत आणि शास्त्रीय पद्धतीने केल्यास गहू पिकावरील तांबेरा (गंज) रोगाचे प्रभावी नियंत्रण करता येईल.
अधिक वाचा: ३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय?
