Join us

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासा; दुबार पेरणीपासून मिळेल सुटका तसेच वाचणार वेळ अन् पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:09 IST

Seed Germination : खरीप हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व तयारी सुरू झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खरीप हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून, पेरणीपूर्व तयारी सुरू झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

योग्य बीजप्रक्रिया आणि उगवणक्षमतेची खात्री झाल्यास पेरणीनंतरचा नुकसानीचा धोका मोठ्या प्रमाणावर टळतो तसेच दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. राज्याच्या अनेक भागात यंदाही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड होण्याची शक्यता आहे.

मात्र पूर्वीच्या अनेक अनुभवांनुसार सोयाबीनच्या बियाणात उगवण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. त्यामुळे घरच्याच बियाणाची उगवणक्षमता तपासून, योग्य बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असा संदेश मे महिन्याच्या सुरुवातीपासून गावपातळीवर कृषी विभाग देत आहे.

उगवणशक्ती तपासायची कशी?

बियाणाच्या साठ्यातून सुमारे १०० दाणे निवडून त्यांची उगम चाचणी करावी. त्यासाठी मातीचा ट्रे, गोणपाठ किंवा टिशूपेपर वापरता येतो. ५ ते ७ दिवसांत किती दाण्यांतून कोंब फुटले यावरून उगवणक्षमता समजते. किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उगम दिसल्यास ते बियाणे वापरण्यायोग्य ठरते.

बीजप्रक्रियेचे फायदे अनेक

• बियाणांची पारख, सकस दाण्यांची निवड, त्यावर जैविक किंवा रासायनिक प्रक्रिया करून बियाणाची प्रत सुधारते. उगवणशक्ती वाढते, रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते.

• त्याचबरोबर जमिनीतील अपायकारक जिवाणूंपासून संरक्षण होते. शेतात एकसंध उगम होतो, पीक सम प्रमाणात वाढते आणि उत्पादनात दर्जा व प्रमाण दोन्ही वाढतो. यामुळे कीटकनाशक व खतांच्या खर्चातही बचत होते.

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे अत्यावश्यक आहे. बीजप्रक्रियेमुळे केवळ उत्पादनच नाही, तर पिकांची एकसंध वाढ, रोगप्रतिकारक व आर्थिक बचतदेखील होते. - मनोजकुमार ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बुलढाणा.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :शेती क्षेत्रलागवड, मशागतखरीपपेरणीशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन