उन्हाळ्यात मका पिकाची लागवड चारा म्हणून केली जाते. त्याचा उपयोग मुख्यत: मुरघास करण्यासाठी केला जातो. या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
बरेच शेतकरी या अळीच्या नियंत्रण व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. परंतू असा चारा जनावरांना खाऊ घातल्यास विषबाधा होऊ शकते. याकरिता चाऱ्यासाठी मका पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी असे करा उपाय◼️ लागवड वेळेवर तसेच एका भागात एकाच वेळी करावी.◼️ लागवडीसाठी सरी-वरंबा पद्धतीचा वापर करावा.◼️ रासायनिक खतांचा अतिवापर टाळा. शिफारशीप्रमाणे खते द्या.◼️ बांधावर मित्रकिटकांना आकर्षित करण्यासाठी झेंडू, सूर्यफूल अशा फुले येणाऱ्या पिकांची लागवड करावी.◼️ मका भोवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळींची सापळा पीक म्हणून लागवड करावी.◼️ पिकामध्ये एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.◼️ लागवड झाल्यानंतर अळीच्या नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी सर्वेक्षणासाठी त्वरित एकरी चार कामगंध सापळे लावावेत.◼️ दररोज सापळ्यात सापडणाऱ्या पतंगांची संख्या मोजावी.◼️ पिकात डोळ्यांनी दिसणारे अंडीपुंज किंवा मोठ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.◼️ लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी लावलेल्या सापळ्यात एकापेक्षा अधिक पतंग प्रति दिवस प्रति सापळा सापडत असतील तर कामगंध सापळ्यांची संख्या वाढवावी.◼️ अळीचा प्रादुर्भाव पाच ते दहा टक्के दिसत असल्यास बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती या कीटकनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा मेटाऱ्हायझियम एनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अधिक वाचा: PM Kisan : पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरु करण्यासाठी करा हे उपाय