आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये सुधारणा झाली आहे किंबहुना शेतकऱ्यांची मेहनत कमी झाली आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी खूप वेळ व मेहनत लागायची, पण ठिबक सिंचनाच्या वापरामुळे आता हे काम अधिक सोपे झाले आहे.
ठिबक सिंचन प्रणालीत पाणी थोड्या थोड्या प्रमाणात, थेट मुळांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पिकांना अधिक प्रभावीपणे पाणी मिळते. सोबत आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर कमी करून अधिक उत्पादन मिळवण्यास मदत करते.
ठिबक पद्धतीचा आणखी एक उपयोग म्हणजे याद्वारे पिकांना खते देखील देता येतात. पिकांना खते योग्य प्रमाणात आणि आवश्यक त्या ठिकाणी देण्यामुळे त्या खतातील पोषणतत्त्वांचा अधिकाधिक फायदा होतो. याच पद्धतीला 'फर्टिगेशन' असेही म्हटले जाते.
फर्टिगेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना खते पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचवणे शक्य होते. या पद्धतीमुळे खते व पाणी एकाच वेळी दिले जातात ज्यामुळे वेळेची बचत होते आणि शेतकऱ्यांना अधिक परिणामकारक शेती करता येते.
फर्टिगेशनचे फायदे
• फर्टिगेशन पध्दतीमध्ये मजुर, यंत्रसामुग्री, इंधन, वीज, पाणी व खते यांची बचत होते.
• पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते.
• विद्राव्य द्रवरुप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडीअम व क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते.
• विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या कार्यक्षेत्रातच दिली जातात, त्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरित्या होते.
• पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशका वरील खर्च कमी होतो.
• पिकांच्या वाढीनुसार म्हणजेच खते देता येतात, त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते.
• खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
• विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे फवारणीद्वारे देता येतात.