lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > पुळेकर कुटुंबीय घेता आहेत बारमाही शेतीतून उत्पन्न

पुळेकर कुटुंबीय घेता आहेत बारमाही शेतीतून उत्पन्न

Pulekar family is getting income from perennial agriculture | पुळेकर कुटुंबीय घेता आहेत बारमाही शेतीतून उत्पन्न

पुळेकर कुटुंबीय घेता आहेत बारमाही शेतीतून उत्पन्न

दापोली तालुक्यातील गव्हे येथील पुळेकर कुटुंब गेली चार वर्षे या पद्धतीचा अवलंब करीत आहे. बारमाही शेतीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गव्हे येथील सतीश पुळेकर यांचे वडील शंकर शेती करत असत.

दापोली तालुक्यातील गव्हे येथील पुळेकर कुटुंब गेली चार वर्षे या पद्धतीचा अवलंब करीत आहे. बारमाही शेतीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गव्हे येथील सतीश पुळेकर यांचे वडील शंकर शेती करत असत.

शेअर :

Join us
Join usNext

वेळ, श्रम, पैशाची बचत करत असतानाच अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी 'चारसूत्री' व "एसआरटी' भात लागवड पद्धत फायदेशीर ठरत आहे. दापोली तालुक्यातील गव्हे येथील पुळेकर कुटुंब गेली चार वर्षे या पद्धतीचा अवलंब करीत आहे. बारमाही शेतीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गव्हे येथील सतीश पुळेकर यांचे वडील शंकर शेती करत असत. त्यांचा मोठा भाऊ सचिन त्यांना मदत करत असे. वडिलांमुळे शेतीची आवड दोन्ही भावंडांमध्ये निर्माण झाली. सचिन यांची पत्नी शीतल यांचीसुद्धा आता शेतीच्या कामात मदत होत आहे. सतीश एका पतसंस्थेत काम करतात. मात्र, त्यांना शेतीची आवड असल्याने सुटीदिवशी तसेच कामावर येण्यापूर्वी सकाळी शेतीच्या कामात मदत करतात.

खरीप हंगामात ६५ गुंठे क्षेत्रावर भात लागवड करीत असून 'वाडा कोलम' व 'रत्नागिरी- सात' (लाल भात लागवड करत आहेत. दहा गुंठे क्षेत्रावर नाचणी लागवड करतात. चारसूत्री, एसआरटी पद्धतीत जमिनीची नांगरणी करून वाफे तयार केले जातात व त्यावर टोचण पद्धतीने भात पेरणी केली जाते. या पद्धतीत नांगरणी, चिखलणी, पुनर्लागवडीची गरज भासत नाही. पारंपरिक लागवडीपेक्षा ३० ते ४० टक्के उत्पन्नात वाढ होत आहे. कुटुंबासाठी वर्षभर लागणारा तांदूळ, नाचणी ठेवून उर्वरित तांदूळ, नाचणीची विक्री पुळेकर करत आहेत. लाल तांदळाला १५० रुपये तर वाडा कोलमसाठी ५० ते ५५ तर नाचणीसाठी ५० रुपये दर लाभत आहे.

भात काढणीनंतर पावटा, वांगी मिरची, दुधी भोपळा, कारली, पडवळ, मका, फरसबी, काकडी, भेंडी, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करत आहेत. ७५ गुंठे क्षेत्राची विभागणी करून भाज्यांची लागवड करत आहेत. स्वतंत्र दोन प्लॉटवर कलिंगड, झेंडू लागवड करीत आहेत कलिंगड लागवड डिसेंबरमध्ये केली जाते. फेब्रुवारी/मार्चमध्ये कलिंगड विक्रीला येतात. आंबा, काजू लागवड असून आंब्याची खासगी विक्री करत आहेत. काजू बी मात्र चांगला दर प्राप्त झाल्यास बीची विक्री करत आहेत.

वाफ्यावरच भाजी लागवड करत असून कंपोस्ट, गांडूळ खताचा वापर शेतीसाठी करत आहेत. त्यामुळे उत्पादन व दर्जा चांगला असून शेतावरच विक्री होत आहे. ग्राहक शेतावर येवून भाज्या, कलिंगडे काकड्यांची खरेदी करीत आहेत दीपावली, मार्गशीर्ष महिन्यात झेंडू विक्रीला उपलब्ध होईल, या पद्धतीने लागवड करत आहेत. जाग्यावरच चांगला दर प्राप्त होत असल्याने विक्री सुलभ झाली आहे.

चारसूत्री पध्दत ठरतेय फायदेशीर
चारसूत्री लागवड पध्दत शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, लागवडीचा (बी, मजूर, खत) खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशीर करणारे आहे. एसआरटी या प्रकारात शेतीची मशागत व गादीवाफे करून कायम स्वरुपी गादी वाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेता येतात. पध्दतीत गादी वाफे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भात कापणी झाल्याबरोबर जमिनीतील असलेल्या ओलाव्याचा फायदा घेऊन करावेत. ही पध्दत फायदेशीर ठरत आहे.

दूध विक्री व्यवसाय
पुळेकर यांच्या चार देशी गाई आहेत. दररोज चार लिटर दूधाची विक्री करून उर्वरित दुध कुटुंबासाठी ठेवण्यात येते. गायीच्या शेणापासून, पालापाचोळा एकत्र करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. कंपोस्ट खतासह गांडूळ खत शेतीसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुरक्षित ठेवण्यास मदत होत आहे. पिकाचा दर्जा व उत्पादन चांगले असल्याने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शेतीसाठी ठिबकसिंचनचा वापर करत असल्याने पाण्याचा वापर मर्यादित होऊन बचत होत आहे.

लाल भाताला विशेष मागणी
रत्नागिरी सात (लाल भात) या विद्यापिठ प्रमाणित भातामध्ये आरोग्यदृष्ट्या असलेले पोषक गुणधर्मामुळे तांदूळाला चांगला दर मिळतो. १५० रुपये किलो दराने तांदूळ विक्री होते. गरोदर माता, लहान मुले, रुग्णांसाठी लाल भाताची पेज पौष्टीक आहे. लागवडीनंतर १२० ते १२५ दिवसात हे वाण काढणीसाठी तयार होते. कोड लवचिक असल्यामुळे जमिनीवर पडून लोळत नाही. शिवाय उत्पादकता जास्त असणारे हे वाण असल्यामुळे पुळेकर कुटुंबिय आवर्जून या रत्नागिरी सात या वाणाची लागवड करीत आहे. दर चांगला मिळत असल्याने लागवडीचा खर्च निघतो. स्थानिकापेक्षा मुंबई, पुण्यातील ग्राहकांकडून लाल तांदूळासाठी विशेष पसंती मिळत आहे.

- मेहरून नाकाडे

Web Title: Pulekar family is getting income from perennial agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.