जळगाव : हमीभावांतर्गत (एमएसपी) ८ हजारांवर अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली असताना २८ फेब्रुवारीपर्यंत भरडधान्याची खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून ठरलेल्या दराने शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे जिल्ह्यातील केंद्रांवर दिसून येत आहे.
खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत आधारभूत किंमत दराने ज्वारी आणि मका खरेदीसाठी जिल्ह्यात अठरा खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत.
यात मूग, उडीद, सोयाबीन यासारख्या पिकांसाठी नाफेड तसेच जिल्हा पणन विभागांतर्गत ज्वारी आणि मका उत्पादनासाठी ही नोंदणी पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. या
१८ केंद्रावर झाली नोंदणी
जिल्ह्यात हमीभाव योजनेंतर्गत अनुक्रमे अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगाव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदूर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव असे १८ केंद्र आहेत. तसेच १२ केंद्रांवर नाफेड अंतर्गत नोंदणी झाली असून खरेदी केली जात आहे.
नाफेडचे १२ केंद्र
नाफेडद्वारे चोपडा, एरंडोल, जळगाव- म्हसावद, जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव, आणि चाळीसगाव या १२ केंद्रांवर सोयाबीन, उडीद, मूगासह शेतमाल उत्पादनाची नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. आतापर्यंत २०१६ सोयबीन उत्पादक, उडीद १२९, मूगासाठी ४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
स्थिरता सुनिश्चित
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली असताना आतापर्यंत ८६ शेतकऱ्यांकडून १७२८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. हमीभाव खरेदी अंतर्गत शेतमाल नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत असल्याने आणि त्यांच्या उत्पन्नाची स्थिरता सुनिश्चित असल्याने उत्पादकांना दिलासा मिळत असल्याची माहिती जिल्हा विपणन अधिकारी सुनील मेने यांनी दिली.
मक्याची सर्वाधिक नोंदणी
जामनेर तालुक्यात मका उत्पादक ५४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हा आकडा जिल्ह्यात सर्वाधिक ठरला आहे. तर बोदवडमध्ये ४८०, अमळनेरात ४७१, चाळीसगावात ४३३ शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी केली आहे. ४४६१ शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी केली असताना १६२९ ज्वारी उत्पादकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यात ३८० यावलमधील, ३०५ पारोळ्यातील उत्पादकांचा समावेश आहे.
