Free Groundnut Seeds : अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (National Food Security Mission – Oilseeds) अंतर्गत उन्हाळी हंगाम २०२५ साठी भुईमूग पिकाचे प्रमाणित बियाणे १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. (Free Groundnut Seeds)
या योजनेमुळे उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड वाढण्यास चालना मिळणार असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.(Free Groundnut Seeds)
या योजनेअंतर्गत बियाण्यांचे वितरण 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर होणार असल्याने पात्र नोंदणीकृत शेतकरी गटांनी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Free Groundnut Seeds)
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, लॉगिन अथवा तांत्रिक अडचण येणाऱ्या गटांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे तालुका कृषी अधिकारी ए. डी. वसेकर यांनी सांगितले.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिवपूर (ता. अकोट) येथील शेतकरी सतीश अशोक बोंद्रे यांनी सातत्याने पाठपुरावा करून कृषी विभागाशी संपर्क ठेवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अकोट तालुक्यातील शेतकरी गटांना या राष्ट्रीय योजनेचा थेट लाभ मिळण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली आहे.
गट व क्लस्टर पद्धतीने अंमलबजावणी
ही योजना आत्मा अंतर्गत गट व क्लस्टर पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वी स्थापन झालेल्या नोंदणीकृत शेतकरी गटांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रत्येक १० हेक्टर क्षेत्रासाठी एक गट तयार करण्यात येणार असून, एका गटामध्ये कमाल २५ शेतकऱ्यांचा समावेश असू शकतो.
प्रत्येक शेतकऱ्याला मर्यादित लाभ
योजनेत समान संधी मिळावी, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त १ एकर क्षेत्रापुरतेच भुईमूग बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात वाढ होऊन तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल पडणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
उन्हाळी हंगामात पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेतही भुईमूग पीक फायदेशीर ठरत असल्याने, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वेळेत अर्ज न केल्यास संधी हुकण्याची शक्यता असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर होणाऱ्या या वितरणासाठी नोंदणीकृत शेतकरी गटांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
