गजानन मोहोड
खरीप हंगामातील ऑनलाइन ई-पीक नोंदीचा कालावधी संपुष्टात आल्याने राज्यातील किमान १० टक्के शेतकऱ्यांची पीकपेरा नोंद अद्याप प्रलंबित आहे. (E-Peek Pahani Offline)
अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार ऑफलाइन पद्धतीने पीकपेरा नोंदणीची संधी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी १७ ते २४ डिसेंबरदरम्यान ग्रामस्तरीय समितीकडे अर्ज करणे बंधनकारक आहे.(E-Peek Pahani Offline)
या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना (Guidelines) राज्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केल्या आहेत. (E-Peek Pahani Offline)
ग्रामस्तरीय समितीद्वारे शेताची प्रत्यक्ष पाहणी
ऑफलाइन पीकपेरा नोंदणीसाठी ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष : मंडळ अधिकारी
सदस्य : तलाठी (ग्राम महसूल अधिकारी), ग्रामविकास अधिकारी, सहायक कृषी अधिकारी
ही समिती संबंधित शेतकऱ्याच्या शेताची प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असून, लगतच्या तीन ते चार शेतकऱ्यांना साक्षीदार म्हणून उपस्थित ठेवले जाईल.
संबंधित शेतकऱ्याने कोणते पीक पेरले आहे, याचा पंचनामा केला जाईल तसेच शेजारील शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
बी-बियाणे व खतांच्या पावत्या सादर करणे बंधनकारक
पीकपेरा नोंदणीसाठी संबंधित शेतकऱ्याला बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदीच्या पावत्या सादर कराव्या लागणार आहेत. तसेच समिती गतवर्षीची पीकपेरा नोंद तपासून, पीक व क्षेत्राची अचूक नोंद पंचनाम्यात घेणार आहे.
जिल्हाधिकारी देणार शासनाला अंतिम अहवाल
जिल्हाधिकारी हे एसडीओ, तहसीलदार, बीडीओ आणि तालुका कृषी अधिकारी यांची समिती स्थापन करून संपूर्ण प्रक्रियेवर दररोज देखरेख ठेवणार आहेत.
ग्रामस्तरीय समितीचा अहवाल
८ ते १२ जानेवारीदरम्यान एसडीओ स्तरावरील समितीकडे
एसडीओ समितीकडून तपासणीनंतर १३ ते १५ जानेवारीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल
यानंतर १५ जानेवारीनंतर हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असून, शासनाची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर ऑफलाइन पीकपेरा नोंद अद्ययावत केली जाणार आहे. तक्रार आल्यास किंवा आवश्यकता भासल्यास फेरचौकशीही करण्यात येणार आहे.
ऑफलाइन पीकपेरा नोंदीसाठी कालबद्ध कार्यक्रम
| टप्पा | कालावधी |
|---|---|
| शेतकऱ्यांनी ग्राम समितीकडे अर्ज करणे | १७ ते २४ डिसेंबर |
| ग्रामस्तरीय समितीची स्थळ पाहणी | २५ डिसेंबर ते ७ जानेवारी |
| अहवाल एसडीओ समितीकडे सादर | ८ ते १२ जानेवारी |
| एसडीओकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल | १३ ते १५ जानेवारी |
तलाठी/मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन
ई-पीक पाहणी राहिलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा व त्यासोबत बियाणे, खते व कीटकनाशक खरेदीच्या पावत्या जोडाव्यात. ही प्रक्रिया ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
