नागपूर : शेत पाणंद रस्ते योजना २०२१ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत असून, मार्च २०२६ अखेरपर्यंत राज्यात ४५ हजार किलोमीटर लांबीचे शेत पाणंद रस्ते पूर्ण होणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली. सदस्य सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री गोगावले बोलत होते.
केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणारा निधी थेट कामांसाठी वर्ग करून महाराष्ट्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून रोजगार हमी मंत्री गोगावले म्हणाले की, शेतामध्ये जाणारे पाणंद रस्ते हे थेट शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आणि फायद्याचे आहेत.
मात्र, दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी सहकार्य न केल्यास अडचणी निर्माण होतात. आतापर्यंत १७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, २७ ते २८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सध्या प्रगतीपथावर आहेत.
आठ दिवसांत निधीचे वितरण
यावर्षी मजुरीवर ११ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, मार्चपर्यंत हा खर्च १६ ते १७ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाकडून १०० दिवसांच्या मजुरीचा निधी आणि राज्य शासनाकडून अतिरिक्त निधी देऊन रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत विहिरी, गोठे आदींसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे १,५०० कोटी रुपयांचा निधी आहे. तो येत्या आठ दिवसांत वितरित करण्यात येणार आहे, असे गोगावले म्हणाले.
