Pune : कोकणात मिळणारा हापूस आंबा जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात थेट शेतकरी ते ग्राहक हापूस आंबा खरेदी-विक्री व्हावी यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पण यंदा दिल्लीतही हापूस आंब्याचे प्रदर्शन होणार असून दिल्लीकरांना अस्सल हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे १ मे व २ मे रोजी भव्य हापूस आंबा विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त असलेल्या हापूस आंब्याला राष्ट्रीय स्तरावर मोठी बाजारपेठ आणि प्रसिद्धी मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये
• अस्सल कोकणी हापूस : या प्रदर्शनात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील GI प्राप्त आंबा उत्पादक शेतकरी तसेच देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.
• गुणवत्तेची खात्री (UID स्टिकर) : उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक आंब्यावर संबंधित शेतकऱ्याच्या उत्पादनाचा तपशील असलेला UID स्टिकर असेल, ज्यामुळे ग्राहकांना अस्सल हापूसची खात्री मिळेल.
• साका विरहित आंबा : विक्रीपूर्वी आंबा स्कॅनिंग मशीनवर तपासला जाणार असल्याने, 'साका' या नैसर्गिक दोषाविरहित सर्वोत्तम दर्जाचा आंबा ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल.
• थेट विक्री : या प्रदर्शनाद्वारे शासन शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
या प्रदर्शनामध्ये अंदाजे १००० डझन हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे दिल्ली व परिसरातील आंबा प्रेमींना अस्सल हापूसची चव चाखायला मिळेल आणि शेतकऱ्यांनाही त्यांच्या कष्टाचा योग्य भाव मिळण्यास मदत होईल. दिल्ली आणि एनसीआर (NCR) क्षेत्रातील जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
