लातूर जिल्ह्याच्या उदगीर मार्केट यार्डमध्ये एक महिन्यापासून चिंचेची आवक सुरू झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिंचेचे उत्पादन कमी झाल्यामुळे चांगल्या प्रतीच्या चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी असून ३० हजार क्विंटलचा भाव मिळत आहे.
यामुळे उदगीरबाजारात उलाढाल वाढली असून बाजार समितीला मार्केट फीसच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळणार आहे.
बाजारात सरासरी दोन महिने चिंचेची आवक होत असते. त्यामुळे ग्रामीण भागात चिंच फोडण्यापासून ते बाजारात चिंच आणून आडतीवर विक्री झाल्यानंतर खरेदीदार व्यापारी पाला करून ट्रकमध्ये भरेपर्यंत हजारो लोकांना मजुरी देणारा व्यवसाय आहे.
पावसाळ्यात फुलोऱ्यात असताना शेतकरी चिंचेच्या झाडाचा व्यापाऱ्यांना चिंचेचा व्यवहार करतात. छोटे व्यापारी ग्रामीण भागातील चिंच गोळा करून फोडून विक्रीसाठी घेऊन येतात.
उदगीर बाजारात शेजारच्या नांदेड व कर्नाटकातील सीमावर्ती भागातून चिंच मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. त्यामुळे दरही चांगला मिळतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाव जास्त...
• गेल्या वर्षी चिंचेला सर्वसाधारण ९ हजार ते १४ हजार क्विंटलचा भाव मिळाला होता. यावर्षी १२ हजार ते १७ रुपयांचा सर्वसाधारण दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
• चांगल्या प्रतीच्या चिंचेला ३० हजार रुपये प्रति क्विंटलचा दर उदगीर बाजारात मिळत आहे. त्यामुळे यावर्षी चिंच उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे जास्तीचे पडणार आहेत.
• उदगीर बाजार समितीमध्ये इतर राज्यात असणारे व्यापारी चिंच खरेदीसाठी येतात. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. हीच वाढ आगामी काळात वधारण्याची शक्यता आहे.
उत्पादन कमी आणि मागणी अधिक...
यंदा चिंचेचे उत्पादन कमी झाले आहे. परंतु हैदराबाद, तेलंगणा, तामिळनाडू राज्यात चिंचेचा वापर दररोजच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर होत असतो. चिंच वर्षभर टिकवण्यासाठी शीतगृहाचा वापर व्यापारी करत असतात. उत्पादन कमी झाल्याने दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
बाजारपेठेत ५०० ते ७०० क्विंटलची आवक...
सध्या दररोज ५०० ते ७०० क्विंटल चिंचेची आवक होत आहेत. मार्च महिन्यात उत्पादित झालेली चिंच शीतगृहात साठवून करून ठेवण्यास उत्तम असल्याचे समजले जाते. त्यामुळे या महिन्यात बाजारात येणाऱ्या चिंचेला मोठी मागणी असते व दर सुद्धा चांगला मिळतो.
तेलंगणा, तामिळनाडू राज्यामधून मागणी...
• यावर्षी चिंचेचे उत्पादन कमी झाल्यामुळे तेलंगणा व तामिळनाडू राज्यातून चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच हैदराबाद येथील अनेक साठा करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात चिंचेची खरेदी करत आहेत.
• त्यामुळे यंदा चिंचेला अधिक दर मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. चिंच उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज ग्रामीण भागातील छोटे व्यापारी सांगत आहे. तेलंगणा, तामिळनाडू, हैदराबाद येथून चिंचेला सध्या मागणी चांगली आहे. आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत. येणाऱ्या काळात चांगल्या प्रतीच्या चिंचेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. - नरसिंग रमासाने, चिंच खरेदीदार, उदगीर जि. लातूर.