अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यासह भारतात बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे प्रथमच दरात तेजी होती. मागील आठवड्यात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला प्रति किलो ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. या दरामुळे शेतकरी, व्यापारी खुश झाले.
पण, व्यापारी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद आठ दिवसही टिकला नाही. चिनी बेदाण्याचा शिरकाव झाल्यामुळे आठ दिवसात २५ टक्के बेदाण्याचे दर उतरल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांची झोपच उडाली आहे. महाराष्ट्रात अजून ६० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षांत बेदाण्याचे उत्पादन दोन लाख ५० हजार टनापर्यंत झाले होते. २०२४-२५ वर्षात द्राक्षाचे उत्पादन घटल्यामुळे दर तेजीत राहिल्यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
बेदाण्यासाठी खूप कमी द्राक्ष आली. यामुळे केवळ एक लाख ७० हजार टनच बेदाण्याचे उत्पादन झाले. बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे एप्रिलपासूनच दरात तेजी कायम राहिली.
सुरुवातीला प्रति किलो २५० ते ३०० रुपये बेदाण्याचे दर होते. यामध्ये वाढ होत जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला प्रति किलो ५०० ते ६०० रुपये असा विक्रमी दर मिळाला.
दरात तेजी म्हटल्यावर शेतकऱ्यांसह व्यापारीही खुश होते. पण, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद फार काळ टिकला नाही. चिनी बेदाण्याचा भारतात शिरकाव झाला आणि देशातील बेदाण्याचे दर २५ टक्क्यांनी दणक्यात उतरले.
निकृष्ट दर्जाचा बेदाणा- चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे.- आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत.- या करचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून देशाच्या महसुलाचे नुकसान होत आहे.- ऐन हंगामात होत असलेल्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्यांचे दर प्रतिकिलो १२५ रुपयाने घसरलेत.- याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.
बेदाण्याचे दर गडगडले (दर प्रति किलो)
प्रकार | आठ दिवसांपूर्वी दर | सध्याचे दर |
हिरवा | ४०० ते ४५० | ३३० ते ४०० |
लांब सुंटेखानी | ४०० ते ५५० | ३५० ते ४३० |
पिवळा | ३५० ते ४०० | ३०० ते ३७० |
काळा | १५० ते २०० | १०० ते १५० |
मध्यम प्रतीचा | ३५० ते ४०० | ३०० ते ३४० |
चीनमधून आयातीमुळे देशाचे नुकसान : अजित पवारचीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे केली आहे.
बेदाणा उत्पादन दृष्टिक्षेप
वर्ष | उत्पादन (टनात) |
२०१७-१८ | १,६०,००० |
२०१८-१९ | १,७०,००० |
२०१९-२० | १,८०,००० |
२०२०-२१ | १,९५,००० |
२०२१-२२ | २,५७,००० |
२०२२-२३ | २,७२,००० |
२०२३-२४ | २,४६,००० |
२०२४-२५ | १,७०,००० |
चीनचा बेदाणा देशात विक्रीसाठी आल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. केंद्र सरकारने बेदाणा कुठून कसा, किती आला, याची चौकशीचे आश्वासन दिले आहे. बेदाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी विमानतळ, बंदरे, बाजारपेठांच्या ठिकाणी तपास यंत्रणा करावी. राज्य कडूनही बेदाण्याची चौकशीची केंद्राकडे मागणी केली. - कैलास भोसले, राज्याध्यक्ष, द्राक्षबागायतदार संघ
चिनी बेदाण्याचा नेपाळ मार्गे भारत शिरकाव झालेला आहे. या बेदाण्याची विक्री सध्या कोलकाता, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशासह मुंबईतही सुरू आहे. या बेदाण्यामुळे देशातील उत्पादित बेदाण्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी आठ दिवसात उतरले आहेत. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भारतातील द्राक्ष उत्पादक, व्यापारी आर्थिक अडचणीत येतील. - राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, बेदाणा असोसिएशन, सांगली-तासगाव
अधिक वाचा: आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर