भारत-पाकिस्तान युद्धामुळे सामान्य माणसांमध्ये चिंता आहे. हे जरी खरे असले तरी सध्या युद्धाचा इतक्या लवकर परिणाम जाणवणार नाही. युद्धाचा कालावधी नेमका किती दिवस राहतो, त्यावरच तीव्रता ठरणार असून, पहिला चटका पेट्रोल, डिझेल देऊ शकते.
त्यामुळे आपोआपच रासायनिक खतांसह जीवनावशक्य वस्तूंच्या दरात वाढ होण्याचा धोका आहे; पण साखर व दूध निर्यातीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
युद्धामुळे बाजारपेठेवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. युद्धाचे सावट किती दिवस राहणार, यावरच पुढचे दिवस कसे राहणार हे ठरणार आहेत.
उत्तरेकडील गुंतवणुकीवर होणार परिणाम
उत्तर भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर युद्धाचा परिणाम हळूहळू जाणवू लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे गुंतवणूक कमी झाली तर त्याचा फटका उत्तर भारताला बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दूध पावडर १% निर्यात
• कोल्हापूर आणि त्यातही महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास येथील साखर व दूध व्यवसायाला या परिस्थितीचा फारसा फटका बसणार नाही. दुधाचे उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत नसल्याने दूध निर्यात होत नाही.
• दूध पावडर निर्यात केवळ १ टक्काच होते. साखर निर्यातीचा केंद्र सरकारने वर्षभरासाठी कोटा ठरवून दिल्याने त्याच्यावर परिणाम होणार नसल्याचे मत आहे.
सोने खरेदीकडे कल वाढणार
युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने बाजार गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य तसेच मोठे गुंतवणूकदार इतर गोष्टींपेक्षा सोन्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकतात.
कोणत्याही देशाला युद्ध परवडणारे नसते. भारत-पाकिस्तान युद्ध किती दिवस राहणार, यावरच पुढील गोष्टी अवलंबून राहणार आहेत. हा कालावधी वाढला तर इंधनाचे दर वाढून त्याची झळ थेट सामान्य माणसांपर्यंत येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. - डॉ. चेतन नरके, वाणिज्य सल्लागार, थायलंड सरकार.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या