यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी आवक तसेच जागतिक व देशांतर्गत पातळीवरील घडामोडींचा परिणाम म्हणून अकोला जिल्ह्यात कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. कापसाचे दर प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, हे दर गत काही वर्षातील उच्चांकी मानले जात आहेत.
दरम्यान, कापसाचे दर लवकरच प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे कापूस विपणन तज्ज्ञांचे मत आहे. अकोला जिल्ह्यातील मध्यम धाग्याच्या कापसाचे दर थेट ८ हजार ४०० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल इतके नोंदविण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे मूर्तिजापूर, अकोट तालुक्यातही कापसाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, खासगी व्यापाऱ्यांनी शासनाच्या कापूस महामंडळाच्या (सीसीआय) हमी भावालाही मागे टाकले असून, बाजारात सीसीआयपेक्षा अधिक दर मिळत आहे.
यंदाच्या हंगामात कापूस लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यासोबतच कापूस आयातीवरील शुल्कवाढ, सरकीच्या दरात झालेली वाढ आणि बाजारात अपेक्षेपेक्षा कमी आवक या कारणांमुळे कापसाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे.
पांढऱ्या सोन्याने दाखविली चमक
हंगामाच्या सुरुवातीला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिर असलेले दर आता थेट ८ हजार ४०० ते ८,५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने 'पांढऱ्या सोन्याने' पुन्हा एकदा चमक दाखवली आहे.
सीसीआयपेक्षा बाजारभाव अधिक
• शासनाने २०२५-२६ हंगामासाठी १ मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार ७१० रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने मध्यम धाग्याचा कापूस मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो.
• सीसीआयकडून हमीभावाने खरेदी सुरू असली, तरी बाजारपेठेत खासगी व्यापारी हाच कापूस ८ हजार १०० ते ८ हजार २०० रुपये, तर काही ठिकाणी ८ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत.
• त्यामुळे अनेक शेतकरी सीसीआयऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीस प्राधान्य देत आहेत.
