शिवाजी पवारश्रीरामपूर : बांगलादेशाने गेल्या तीन महिन्यांपासून आयातीवर केलेल्या बंदीमुळे यंदा कांद्याचे बाजारभाव वधारण्याची शक्यता कमी आहे.
येत्या काही दिवसांत बांगलादेशाने भारतीय कांदा स्वीकारला नाही व दक्षिणेतील राज्यांतील कांदाबाजारात दाखल झाला तर भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना फटका बसला आहे.
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत यंदा शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली आहे. ऑगस्टनंतर बाजारभाव तेजीत राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
मात्र, त्यांच्यासाठी स्थिती सुधारण्याची कोणतीच चिन्हे तुर्तास दिसत नाहीत. सध्या कांद्याचे बाजारभाव उच्च प्रतीच्या मालास १,८०० ते १,९०० रुपये क्विंटलपर्यंत स्थिरावलेले आहेत.
लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधत कांद्याच्या बाजाराची स्थिती जाणून घेतली. ते म्हणाले, बांगलादेश व श्रीलंका है दोन देश भारतीय कांद्याचे मुख्य बाजार राहिलेले आहेत.
मात्र, बांगलादेशने २०१९ पासून कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा संकल्प केला होता. त्यातून तेथे यंदाच्या वर्षी ४० टक्के कांद्याचे अधिकचे उत्पादन झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना सुरक्षा कवच म्हणून त्यांनी भारतीय कांद्यावर गत तीन महिन्यांपासून आयातबंदी केलेली आहे. दुसरीकडे श्रीलंकेतील आर्थिक स्थिती अद्याप पुरेशी सुधारू शकलेली नाही. त्यामुळे तेथे जेमतेम निर्यात सुरू आहे.
परिणामी पूर्ण क्षमतेने कांद्याची निर्यात यंदा होऊ शकलेली नाही. दुबईमार्गे काही देशांमध्ये निर्यात सुरू आहे. मात्र, नवीन बाजारपेठा शोधण्यात आपल्याला अपयश आलेले आहे.
दक्षिण अफ्रिका, रशिया, फिलिपाइन्स, अमेरिका येथील बाजारपेठा भारतीय कांद्यासाठी निर्माण करता आलेल्या नाहीत.
देशांतर्गत स्पर्धा◼️ लसूण उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात आता कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. यासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही कांद्याचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे.◼️ बांगलादेशाने भारतीय कांद्याला दरवाजे खुले केले नाही तसेच दक्षिणेतील कांदा ऑगस्टमध्ये बाजारात आला, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी वाईट चित्र राहील, असे वाढवणे यांचे म्हणणे आहे.
११ लाख टनाची निर्यात◼️ नाशिक जिल्हा हा कांद्यासाठी निर्यातभिमुख बाजार मानला जातो. जुलै महिन्याच्या प्रारंभी येथून सरासरी २२ ते २३ लाख मेट्रिक कांद्याची निर्यात केली जाते.◼️ यंदा मात्र अवघ्या ११ लाख मेट्रिक टनाची निर्यात झाली आहे. त्याचा फटका नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे.
अधिक वाचा: तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर