Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या शेतमालाला मिळतोय अधिक भाव? तर कुठे आहे मंदी; जाणून घ्या बाजारपेठेतील सविस्तर स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:05 IST

तूर, सोयाबीन, सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यात तूर, हरभरा खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्याचे परिणाम पॅकेज्ड फूडवर होण्याची शक्यता आहे.

संजय लव्हाडे

जालनाबाजारपेठेत सध्या ग्राहकी चांगली असून तूर, सोयाबीन, सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यात तूर, हरभरा खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्याचे परिणाम भारतातील पॅकेज्ड फूडवर होण्याची शक्यता आहे.

आवक घटल्यामुळे, मागणी वाढल्याने आणि साठा कमी असल्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी आली. ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारी सोयाबीनचे दर ५००० ते ६७०० आणि बियाणांसाठी लागणाऱ्या सोयाबीनचे दर ७४५० रुपये प्रति क्विंटल असे होते. जालना बाजारात सोयाबीनची आवक ९०० पोती इतकी आहे.

राज्यात यंदा हरभऱ्याचे उत्पादन समाधानकारक झाले असले, तरी शासनाकडून असलेली सुरु हमीभावावरील हरभरा खरेदी अत्यंत संथ गतीने होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

त्यातच शासनाने खरेदी केंद्रांची मुदतवाढ २९ मेपर्यंत दिली असली, तरी वाढविण्यात आलेले खरेदीचे उद्दिष्ट अल्प असल्याने सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदीविना घरातच पडून राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चोवीस तासांत सोन्याच्या दरात ५००० रुपयांची वाढ

• गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीशिवाय सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार रुपयांवरून थेट १ लाख ५३ हजारांवर पोहोचला.

• फक्त सोनेच नाही, तर चांदीनेही ग्राहकांना मोठा शॉक दिला आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात १० हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदी २ लाख ५० हजारांवरून थेट २ लाख ६० हजार रुपयांवर गेली आहे. ऐन लग्नसराईत ग्राहक हवालदिल झाले.

• एफएमसीजी कंपन्या लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याची बातमी आहे. डाबर या प्रसिद्ध एफएमसीजी कंपनीने आपल्या बहुतांश उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

• इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील संकटामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम आता उत्पादनांच्या किमतींवर दिसत आहे. लवकरच साबण, शाम्पू, पावडर, चहा, कॉफी, बिस्किटे, सर्व प्रकारच्या पॅकेज्ड फूड्सच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

English
हिंदी सारांश
Web Title : Market Trends: Which Farm Produce Gets Higher Price? Where is Recession?

Web Summary : Tur, soybean prices rise in Jalna. Government extends tur, gram procurement deadline. Soybean prices surge due to low supply, high demand. Gold, silver prices soar. FMCG products likely to become expensive due to Iran conflict.
टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीजालनामराठवाडा