मुंबई : व्हॅलेंटाइन आठवड्यानिमित्त पुढील सात दिवस प्रेमासाठी काही खासच आहेत. प्रेमी युगुलांना व्हॅलेंटाइन डे जल्लोषात साजरा करता यावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील बाजारपेठा सजून निघाल्या आहेत.
विशेषतः दादर येथील फुलांच्या बाजारपेठेत गुलाबांच्या फुलांनी बहर आणला आहे. आठवड्याभरापासून गुलाबांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने त्यांच्या किमतीही प्रेमासारख्याच चढ्या झाल्या आहेत.
दादर फूल मार्केटमध्ये सध्या चायनीज गुलाबांच्या जुडीसाठी ५०० ते ७०० रुपये, तर काही ठिकाणी थेट १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. एका जुडीमध्ये २० गुलाबांची फुले असतात.
रोज मात्र ही जुडी ३०० ते ५०० रुपयांना विकली जाते; तर रोजच्या दिवसांत १०० ते १५० रुपयांना मिळणारी गुलाबजुडी आता व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर ३०० रुपयांवर स्थिरावली.
पुढील आठवडाभर गुलाबांच्या किमती अशाच राहण्याची शक्यता दादर फूल मार्केटमधील व्यापारी गणेश मोकल यांनी सांगितले.
सोलापूर बाजारात गुलाबाचा दर
पुणे आणि मुंबई येथून सोलापूरच्या बाजारात गुलाबांची आवक सुरू आहे. मात्र, बदलत्या हवामानाचा फटका आणि इतर कारणांमुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अत्यंत कमी असल्याने गुलाबाचे दर गगनाला भिडले आहेत.
घाऊक बाजारात साधारण २० कांडी असलेल्या गुलाबाच्या एका पेंढीचा दर तब्बल ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे विक्रेत्यांनाही नाईलाजाने चढ्या भावाने फुलांची विक्री करावी लागत आहे.
गुलाबाचे दर तेजीत
लाल गुलाब ५० (प्रति नग)
पिवळा/पांढरा गुलाब ६० (प्रति नग)
गुलाब पेंढी (२० नग) ८०० (घाऊक)
लोकल गुलाब ६० ते ८०
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुलाबाची आवक खूपच कमी झाली आहे. पुणे आणि मुंबईवरून माल मागवावा लागत आहे. मागणी प्रचंड आहे, पण त्या प्रमाणात माल उपलब्ध नसल्याने नैसर्गिकरीत्या दर वाढले आहेत. उद्या मागणी वाढल्यास हे दर आणखी थोडे वाढू शकतात. - धनंजय झिंजुर्डे, फूल विक्रेते
अधिक वाचा: Devgad Hapsus : बाजारात देवगडच्या हापूसचे आगमन; वाचा डझनाला काय मिळतोय दर?
