मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देणाऱ्या २०२५-२०२६ शासकीय हमीभाव उडीद, सोयाबीन व मूग खरेदी योजनेचा शुभारंभ बुधवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ पासून करण्यात आला आहे.
ही योजना मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
या संदर्भात माहिती देताना चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांनी उडीद, सोयाबीन व मुग विक्रीसाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एसएमएस नंतरच आपला माल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा.
यामुळे खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक राहणार आहे. खरेदी केंद्रासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास संस्थेचे व्यवस्थापक शंभूमामा नागणे तसेच खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख मच्छिंद्र कोंडूभैरी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन अवताडे यांनी केले आहे.
शासकीय हमीभावाने होणाऱ्या या खरेदीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असून, आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा: अपात्र ठरविलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; अखेर अनुदानाच्या पैशाला मिळाली मंजुरी
