Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या दराने केला महत्वाचा टप्पा पार; तेजी आणखी काही दिवस टिकणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:08 IST

Tur Market Rate : तुरीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेली भावातील तेजी आणखी काही दिवस टिकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात तुरीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, प्रतिक्विंटल दर ८,३०० ते ८,६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेली भावातील तेजी आणखी काही दिवस टिकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली होती. कपाशी व सोयाबीन पिकांमध्ये आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणावर तूर घेतली जाते. मात्र, यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते.

अशा परिस्थितीत तूर पिकाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, तुरीच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक मर्यादित राहिली आहे. त्याचा थेट परिणाम दरवाढीवर दिसून येत आहे. बाजारात तुरीची उपलब्धता कमी राहून दरावर वाढीचा दबाव कायम असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सध्याची बाजारातील स्थिती

जिल्ह्यात तुरीची आवक मर्यादित असून, मागणी मात्र वाढलेली आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा निर्माण झाली असून, दरांनी उच्चांक गाठला आहे. आवक कमी आणि साठवणूक वाढल्याने पुढील काही दिवस दर स्थिर किंवा वाढीच्या दिशेने राहण्याची शक्यता आहे.

व्हायरसजन्य रोगाचा फटका

यंदा जिल्ह्यातील अनेक भागांत तुरीवर व्हायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. झाडांची वाढ खुंटणे, फुलगळ होणे व शेंगांची संख्या घटणे असे परिणाम झाल्याने हेक्टरी उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली. यामुळे बाजारात दर्जेदार तुरीची आवक कमी झाली असून, दरवाढीस हे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

बाजार समिती बंद, खासगी व्यापाऱ्यांची खरेदी

जिल्ह्यातील बाजार समित्या गुरुवारी बंद असतानाही खासगी व्यापाऱ्यांनी तुरीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. यावरून तुरीला सध्या मोठी मागणी असल्याचे स्पष्ट होते.

तूर दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार

सोयाबीन व इतर पिकांचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांसाठी तूर हेच आधाराचे पीक ठरले आहे. सध्याचे वाढलेले दर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सावरण्यास मदत करणारे ठरत आहेत.

भाववाढीमुळे विक्रीला ब्रेक

भाव आणखी वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सध्या तुरीची विक्री थांबवली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्धता कमी राहून दरावर वाढीचा दबाव कायम आहे. खामगाव बाजार समितीत मंगळवारी ८७०० रुपये जास्तीत जास्त दर होता.

सध्या बाजारात दर्जेदार मालाची उपलब्धता मर्यादित आहे. तर, खरेदीची मागणी चांगली आहे. त्यामुळे व्यवहारांमध्ये स्पर्धा वाढली असून, भावात हालचाल सुरूच आहे. - विनोद बोंबटकार, व्यापारी, खेर्डा.

तुरीला मिळणारे सध्याचे दर खर्च भरून काढण्यास मदत करणारे ठरत आहेत. भाव स्थिर राहिले तर पुढील हंगामासाठी थोडा दिलासा मिळेल. - नरेश वानखडे, शेतकरी, खेर्डा.

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Dal Prices Surge in Buldhana; Farmers See Economic Relief

Web Summary : Tur dal prices in Buldhana district have risen significantly, reaching ₹8,600 per quintal, providing relief to farmers. Limited supply due to virus-related crop damage and increased demand are driving the surge. Traders anticipate prices will remain high for some time, offering economic support to farmers affected by soybean crop failures.
टॅग्स :तूरबाजारबुलडाणाशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डमराठवाडाविदर्भ