योगेश गुंड
अहिल्यानगर बाजार समितीत डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून लाल आणि सफेद तूर आवक होत आहे. प्रारंभी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर असलेल्या तुरीला बुधवारी (दि.८) सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
बाजारात सध्या नवी तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तुलनेत दर कमालीचे घसरले आहेत. क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीन, कपाशीसह तुरीला बसला. पावसाच्या उघडीपमुळे पिकांची वाढ खुंटली. त्यातच ऐन भरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले.
तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना अतिवृष्टीचा फटका बसला, त्यामुळे तुरीचे नुकसान झाले. यातून पीक सावरते न सावरते तोच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला. यातून सावरलेले पीक सध्या बाजारात आले आहे.
तुरीचे भाव दीड हजारांनी पडले
● अहिल्यानगर येथे तूर खरेदी करणाऱ्या प्रमुख बाजारपेठा आहेत. येथे प्रामुख्याने लाल तूर आवक होते.
● सध्या लालपेक्षा सफेद तूरला ५०० रुपये अधिक भाव असला तरी आवक मात्र लाल तुरीची अधिक आहे.
पावसाचा फटका तूर हंगामाला
अहिल्यानगरच्या बाजारात तूर आवक सुरू आहे. परंतु, गतवर्षीपेक्षा आवक कमी आहे. दरांमध्ये चढ-उतार आहेत. परंतु, इतर ठिकाणापेक्षा अहिल्यानगर बाजार समितीत दर चांगले आहेत.
बाजार समितीत काय भाव ?
अहिल्यानगर बाजार समितीत १ डिसेंबर रोजी सफेद आणि लाल तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये दर होते. १९ डिसेंबरला हे दर कमी होऊन ७ हजार ४०० रुपये झाले. १ जानेवारी रोजी लाल तूर ७ हजार १०० रुपये प्रतिक्चिटल दराने विक्री झाला. सध्या हे दर कमी होऊन ६ हजार ५०० पासून ७ हजार ३०० रुपये आहेत.
भाव आणखी पडणार
● सध्या सरासरी ७०० ते ८०० क्विंटल तूर विक्रीसाठी येत आहे. किमान ६ हजार ९०० ते कमाल ७ हजार २०० रुपये क्विंटलने सफेद लाल विक्री होत आहे. तर पांढरा तूर ६ हजार ७०० ते ७ हजार ७० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे.
● एकीकडे उत्पादनात घट झाली असताना दुसरीकडे भावही कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे. अहिल्यानगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी हे जिल्ह्यातील प्रमुख तूर उत्पादक तालुके आहेत. अतिवृष्टीमुळे तुरीचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले आहे.
तूर काढणीला वेग
मागील दीड महिन्यापासून तूर काढणीचे काम सुरू आहे. उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकऱ्यांना डाळीसाठी लागेल तेवढे उत्पादनही झाले नाही.
सोयाबीनच्या दरातही घसरण
अहिल्यानगर बाजार समितीत सोयाबीनच्या दरातही घसरण कायम आहे. सध्या सोयाबीन ४ हजार ते ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दरात व्यापारी खरेदी करत आहेत. येलो मोझाईकमुळे खराब झालेल्या सोयाबीनचे उत्पादनही निम्मे झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. त्यात उत्पादन नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे.
अहिल्यानगर तालुक्यात यंदा तूर उत्पादक नुकसानीच्या गर्तेत आहेत. उत्पादन घटले आहे. हवामानाने साथ दिलेली नाही. निम्मेच उत्पादन हाती आले आहे. - तुकाराम लांडगे, शेतकरी, सारोळा बद्धी.
हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक