शेतकऱ्यांचे 'पिवळे सोने' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीने यंदा बाजारपेठेत मोठी उलथापालथ घडवून आणली. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरात डिसेंबर महिना उजाडताच सुधारणा पाहायला मिळाली.
मात्र, जेव्हा शेतकऱ्यांकडे माल होता तेव्हा भाव दबावात होते आणि आता भाव वधारले आहेत, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नाही. परिणामी, या भाववाढीचा खरा लाभ घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सुरुवातीला हळदीला क्विंटलमागे एक ते दोन हजार रुपये कमी भाव मिळाला. एप्रिल आणि में महिन्याच्या मुख्य हंगामात हळदीला सरासरी १४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. जून आणि जुलैमध्ये या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या काळात भाव स्थिर राहिले.
मात्र, डिसेंबर महिना सुरू होताच बाजारातील चित्र बदलण्यास सुरुवात झाली. आवक मंदावताच हळदीला सोन्याची झळाळी मिळाली असून, सध्या हे दर सरासरी १६ हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्ड हे हळदीसाठी प्रसिद्ध असून, येथे मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते.
मुख्य हंगामात या ठिकाणी दररोज सरासरी ४ ते ५ हजार क्विंटलची आवक असते. मात्र, सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ही आवक घटून केवळ एक ते दीड हजार क्विंटलवर आली आहे. आवक कमी झाल्यामुळेच दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. तर दुसरीकडे अगोदरच हळद विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच आहेत.
नव्या हळदीला समाधानकारक भाव मिळावा
• नवी हळद साधारणतः १५ मार्चनंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्याची बाजारपेठेतील तेजी पाहता, येणाऱ्या नवीन हंगामात हळदीला समाधानकारक भाय मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
• जर हीच दरवाढ कायम राहिली, तर पुढील वर्षी शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. मात्र, सध्याच्या स्थितीत 'भाव असून माल नाही' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
हंगाम संपल्यावरच भाव का वाढतात?
जेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमाल उपलब्ध होतो, हंगाम असतो, तेव्हा भाव पडते असतात आणि माल व्यापाऱ्यांच्या गोदामात गेला की भाव वाढतात, हे कोडे शेतकऱ्यांना सुटत नाही. बाजारपेठेच्या या विचित्र गणितामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीही पुढे येत असते. आर्थिक निकडीमुळे शेतकऱ्यांना हंगामातच हळद विक्री करावी लागते. परंतु, त्यावेळी भाव मात्र समाधानकारक मिळत नसल्याचा अनुभव नेहमीचाच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
३५,३८४ हेक्टरवर हळद लागवड
नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन गत दोन-तीन वर्षापासून पडता भाव आणि उत्पादनातील घट यामुळे परवडत नसल्याचे चित्र आहे. तसेच तूर, कापसासह इतर पिकांच्या तुलनेत हळद परवडणारे पीक ठरत असल्यामुळे गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी हळदीकडे वळला आहे. यंदाच्या हंगामात (२०२५-२६) जिल्ह्यात ३५ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे.
सन २०२५-२६ मधील हळद लागवड (क्षेत्र हेक्टरमध्ये)
| तालुका | लागवड क्षेत्र |
| हिंगोली | ७,२२२ |
| कळमनुरी | ५,३५४ |
| वसमत | ११,१३१ |
| औंढा नागनाथ | ५,९८० |
| सेनगाव | ५,६९७ |
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
