नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आठवड्यात टोमॅटोचे भाव किलोमागे १६ ते ३४ रुपयांवरून २६ ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर गेले.
एक आठवड्यात दर दुप्पट झाले आहेत. शेवगा, भेंडी व गवारचे दरही वाढले आहेत. वाटाणा, कोबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर मात्र नियंत्रणात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी १८६ टन टोमॅटोची आवक झाली आहे.
मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्याने दर आठवडाभरात दुप्पट झाले. रोज दरात वाढ होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. बाजार समितीमध्ये ४४६ टन वाटाण्याची आवक झाली आहे.
आवक वाढल्यामुळे दर ५० ते ७० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.
होलसेल व किरकोळ मार्केटमधील दर
वस्तू - होलसेल - किरकोळ
टोमॅटो - २६ ते ६० - ६० ते ८०
भेंडी - ५२ ते ७० - १०० ते १२०
गवार - ७० ते १०० - १४० ते १६०
शेवगा शेंग - १६० ते २०० - ३२० ते ४००
वाटाणा - ३० ते ४० - ६० ते ७०
कोबी - १० ते १६ - ४० ते ५०
फ्लॉवर - १० ते १४ - ४० ते ६०
दुधी भोपळा - १६ ते २४ - ५० ते ६०
अधिक वाचा: शेततळे योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार; आता 'ही' नवीन पद्धत लागू
