मोंढा, हळद मार्केट यार्डातील टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या पडून राहात असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.
परिणामी, शेतकऱ्यांचा शेतमाल भिजण्याची शक्यता आहे. या प्रकाराची बाजार समिती प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, मोंढा, मार्केट यार्डातील टिनशेड व्यापाऱ्यांसाठी नसून, केवळ शेतकऱ्यांसाठी आहेत. यापुढे खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांनी टिनशेडमध्ये न ठेवता इतरत्र हलवावा, अशा सूचना केल्या आहेत.
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यासह संत नामदेव हळद मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येतो. मोजमाप झाल्यानंतर खरेदीदारांनी तो शेतमाल मोंढा, मार्केट यार्डातील टिनशेडमध्ये न ठेवता विहित वेळेत इतरत्र हलविणे गरजेचे आहे.
परंतु, अनेक व्यापारी शेतमालाच्या थप्प्या आठवडाभर ते पंधरा दिवसांपर्यंत टिनशेडमध्येच ठेवतात. काही जण तर महिनाभरही थप्प्या इतरत्र हलवत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांचा शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडते.
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल पावसात भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने आडत व्यापारी, खरेदीदार यांना सक्त सूचना केल्या असून, खरेदी केलेला शेतमाल विहित वेळेत मोंढा, मार्केट यार्डातील टिनशेडमधून इतरत्र हलविण्यास सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी मोंढा, मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेला शेतमाल सुरक्षित राहावा, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बाजार समितीचा नेहमीच प्रयत्न असतो. सध्या अधूनमधून अवकाळी पाऊस होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडू नये, यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या थप्प्या विनाविलंब उचलाव्यात, अशा सूचना केल्या आहेत. - नारायण पाटील, सचिव, कृउबा समिती हिंगोली.