अक्कलकोट : यंदाच्या हंगामात येथील बाजार समितीमध्ये आतापर्यंत २० हजार क्विंटल मूग तर २६ हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे.
एकीकडे उतारा कमी मिळत आहे तर दुसरीकडे दरही कमी मिळत आहे. आशा दुहेरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सर्व बाजूने फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे तीनतेरा वाजले आहेत.
यावर्षी खरीप हंगामपूर्वीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे घाईगडबडीत मिळेल तिथून उधार, उसनवारी करून शेतकऱ्यांनी खरीप पिकाची उच्चांकी पेरणी केली.
त्यानंतर दीड महिना पाऊस गायब झाला. पुन्हा रिमझिम पाऊस झाला. नंतर अतिवृष्टीच झाली. दरम्यान, तोंडाशी आलेला उडीद, मूग यासारख्या पिकांची नासाडी होत राहिली.
त्यानंतर पावसाने एक आठवडा उघडीप दिली. दरम्यान शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा रक्कम देत मशीनद्वारे रास केली. त्यानंतर आडत बाजारात विक्रीसाठी आणले.
मिळत असलेला दर बघून शेतकऱ्याचे डोळे पाणावले. लागवडीचा खर्च, उत्पन्न आणि त्याला मिळालेला दर या सगळ्या संकटातून शेतकरी मार्ग काढत आहे.
मुगाला ९००० पर्यंत दर◼️ अक्कलकोट आडत बाजारात एकूण ६० दुकानदार आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत उडीद २६ हजार क्विंटल तर मुगाची २० हजार क्विंटल आवक झाली आहे.◼️ प्रति क्विंटल उडदाला ३५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. उत्तम दर ७५०० रुपये असला तरी त्या गुणवत्तापूर्ण धान्य मिळत नाही. पावसापूर्वीच धान्याला दर मिळत होता.◼️ रास केलेल्यानंतर हा दर मिळणे कठीण आहे. मुगाला कमीत कमी ५५०० ते ९००० पर्यंत दर मिळत आहेत. पावसात सापडलेल्या धान्याला अत्यल्प दर मिळत आहे.◼️ हे धान्य चेन्नई विरुद्ध नगर सेलम, मदुराई, तुतीकोरीन, संपूर्ण दक्षिण भारत, संपूर्ण छत्तीसगड, भाटापारा, बिलासपूर, रायपूर आणि मध्य प्रदेशात-इंदोर कटनी, जबलपूर, व राजस्थान येथे पाठवले जात आहे.
वेळेपूर्वी पाऊस आल्याने उसनवारी करून उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी केली. ऐन रासीच्या वेळी अतिवृष्टी झाली. त्यानंतर रास केली. एकरी केवळ साडेतीन पाकीट उडीद निघाले आहे. त्याला दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. खर्च सुद्धा निघेना झाला आहे. - सोमनाथ आलुरे, शेतकरी, उडगी
शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, उत्तम धान्य हे विक्रीसाठी यावे ही आमची इच्छा असते. यंदा अतिवृष्टीमुळे सर्वत्र खराब धान्य येत आहे. यामुळे दरसुद्धा शेतकऱ्यांना कमी मिळत आहे. - राजशेखर हिप्परगी, अडत व्यापारी
अधिक वाचा: e pik pahani : ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार