बाळासाहेब काकडे
अतिवृष्टीने सोन्यासारख्या पिकाचे नुकसान झाले, उत्पादन घटले अन् गतवर्षीपेक्षा एक ते दीड हजारानी भावही पडले. मात्र, दुसरीकडे बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती गतवर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागाई गगनाला भिडली असताना शेतमालाचे भाव भुईवर आल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र शासनाने विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केले, पण व्यापाऱ्यांनी आधीच माल खरेदी करून ठेवल्याने ते भाव करीत नाहीत. त्यामुळे जीएसटी कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळताना दिसत नाही. अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणार असल्याची घोषणा सरकारने केली खरी, पण अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंद्यात लिंबू १५०० ते २००० रुपये क्विंटल, कांदा १००० ते १५०० रुपये, बाजरी १८०० ते २०००, सोयाबीन ४००० ते ४२०० रुपये, उडीद ४००० ते ६००० तर मका १५०० ते १८०० रुपये क्विंटल असे भाव आहेत. मशागत, मजुरी, खते, औषधांचे भाव वाढल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.
बाजारात किराणा, सुका मेवा, कापड, सौंदर्य प्रसादने, शोभेच्या वस्तू, रांगोळी, फटाके, इलेक्ट्रिक वस्तूंचे भाव १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. एका बाजूला शेतमालाला कवडीमोल व दुसरीकडे बाजारातील वस्तूंना सोन्याचा भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरे करणे अवघड आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या असमतोल धोरणांबाबत शेतकऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना पसरली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ७० कोटींचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले जाणार आहे. - सचिन डोंगरे, तहसीलदार, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर.
अतिवृष्टीने शेतीमाल पाण्यात गेला. हाती लागलेल्या शेतीमालाला बाजारभाव नाही, मात्र महागाईवर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना सुरक्षा कवच दिले जाते, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दीपोत्सव साजरा करता येणे शक्य नाही. - मधुकर शेलार, बेलवंडी.
शेतमालाचे भाव भुईवर आल्याचे विदारक चित्र
१० ते १५ टक्क्यांनी बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती गतवर्षर्षीपेक्षा वाढल्या आहेत. महागाई गगनाला भिडली असताना शेतमालाचे भाव भुईवर आल्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.