संजय तिपाले
राज्यातील पहिली अधिकृत 'टसर रेशीम कोष बाजारपेठ' आरमोरी (जि.गडचिरोली) येथे उभारण्यास शासनाने मंजुरी दिली होती, यास सरत्या वर्षांत तांत्रिक मान्यताही मिळाली. आता प्रशासकीय मान्यतेनंतर निधी मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे नव्या वर्षात टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला अखेर न्याय मिळणार असून, आरमोरीच्या मातीत 'रेशीम' अध्याय सुरू होणार आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत आरमोरी येथे जिल्हा रेशीम कार्यालयाच्या शासकीय परिसरात ही बाजारपेठ साकारणार असून, यामुळे विदर्भातील रेशीम उद्योगाचे चित्रच बदलणार आहे.
सध्या बाजारपेठेच्या अभावामुळे छत्तीसगढ़, बिहार व झारखंडमधील व्यापारी थेट गावागावांत जाऊन कोष खरेदी करतात. दराची कोणतीही माहिती नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत होती.
चार जिल्ह्यांतील साडेतीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आरमोरी आता केवळ तालुक्याचे नव्हे, तर टसर रेशीम उद्योगाचे विदर्भातील केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल. - अजय वासनिक, जिल्हा रेशीम अधिकारी, गडचिरोली.
अशी असेल 'हायटेक' टसर कोष बाजारपेठ
अत्याधुनिक सुविधा : ही बाजारपेठ केवळ खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नसून, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल.
लिलाव कक्ष : पारदर्शक व खुल्या व्यवहारासाठी स्वतंत्र व्यवस्था.
वाळवण केंद्र व ड्रायर : कोषांमधून पतंग बाहेर येऊन होणारे नुकसान टळणार.
चाचणी कक्ष : कोषांचा दर्जा वैज्ञानिक पद्धतीने तपासला जाणार.
रॉ मटेरियल बैंक : सुरक्षित साठवणुकीची सुविधा.
प्रशिक्षण केंद्र : शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण.
