जळगाव : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून भरडधान्याची खरेदी सुरू होणार आहे. निश्चित करण्यात आलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद, सोयाबीनची तालुकानिहाय केंद्रांवर खरेदी केली जाणार आहे.
या प्रक्रियेची पडताळणी व तपासणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही दक्षता समिती प्रत्येक केंद्रावर प्रक्रियेच्या तपासणीसाठी प्रत्यक्ष भेटी देणार असून, दोषी आढळल्यास संबंधित यंत्रणेवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिला.
शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन पिकाची नोंदणी करावी. नोंदणी ऑनलाइन, पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. खरेदीसाठी एसएमएस प्राप्त होताच शेतकऱ्यांना दर्जेदार भरडधान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रावर जावे लागणार आहे.
भरडधान्य खरेदी केंद्रे : अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, चोपडा.
कडधान्य खरेदी केंद्रे : अमळनेर, चोपडा, कासोद, भडगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, शेंदुर्णी.
शेतकरी नोंदणी व खरेदी कालावधी
- भरडधान्य खरेदी शेतकरी नोंदणी -दि. २७ ऑक्टोबर ते ३१ नोव्हेंबर २०२५
- खरेदी - दि. ३ नोव्हेंबर २०२५ ते २९ 7 फेब्रुवारी २०२६
- कडधान्य खरेदी शेतकरी नोंदणी-दि. ३० ऑक्टोबरपासून
- खरेदी - दि.१५ नोव्हेंबर २०२५ पासून पुढील २० दिवसांपर्यंत
या प्रक्रियेची पडताळणी व तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपनिबंधक, कृषी अधिकारी, पणन अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती अचानकपणे केंद्रांवरच्या नोंदणी व खरेदी प्रक्रियेची तपासणी करणार आहे. तसेच दक्षता पथकदेखील तपासणी करतील. गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला
