Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या लाल मिरचीचा भाव कमी तर कोरड्या लाल मिरचीचा ठसका मात्र वाढतोय; मिरची पावडरचे भाव राहणार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:11 IST

Chilli Market Rate : ओल्या लाल मिरचीचा भाव कमी झालेला असताना कोरड्या लाल मिरचीचा ठसका मात्र वाढू लागला आहे. भाव ९ ते १२ हजार रुपये क्विंटलदरम्यान जात आहे. त्यामुळे यंदा मिरची पावडरचे भाव तेजीत राहतील अशी शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र यंदा कमी होते. त्यामुळे उत्पादनही कमी झाले. परिणामी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मिरचीचा हंगाम संपला आहे. ओल्या लाल मिरचीचा भाव कमी झालेला असताना कोरड्या लाल मिरचीचा ठसका मात्र वाढू लागला आहे. भाव ९ ते १२ हजार रुपये क्विंटलदरम्यान जात आहे. त्यामुळे यंदा मिरची पावडरचे भाव तेजीत राहतील अशी शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. नंदुरबार बाजार समितीत हंगामात किमान दोन ते तीन लाख क्विंटल मिरची आवक होत असते. देशातील प्रमुख मिरची बाजारात नंदुरबारचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेता या ठिकाणी नंदुरबारसह लगतच्या जिल्ह्यातील आणि गुजरातमधून देखील मोठ्या प्रमाणावर मिरची विक्रीसाठी येत असते.

यंदा जवळपास दोन लाख क्विंटल मिरची खरेदी करण्यात आली आहे. आणखी किरकोळ स्वरूपात मिरची आवक सुरू असून आणखी १० ते १५ दिवस आवक सुरू राहील अशी शक्यता आहे. यंदा मिरचीचे क्षेत्र कमी असतानाच अवकाळी पावसाने मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव देखील झाला होता. ही बाब पहाता उत्पादनावर परिणाम झाला होता. परिणामी बाजार समितीत यंदा दीड लाख क्विंटलच्या दरम्यानच आवक राहील, अशी शक्यता असताना आवक मात्र दोन लाख क्विंटलपर्यंत गेल्याने गेल्यावर्षीच्या सरासरीत येथील उलाढाल झाल्याचे चित्र आहे.

प्रक्रिया उद्योगासाठी कोरड्या मिरचीचा होतोय उपयोग...

• बाजारात सध्या कोरड्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे. ९ हजार ते १२ हजार रुपये क्विंटलदरम्यान मिरची आहे. स्थानिक व्यावसायिक ओली मिरची खरेदी करून ती सुकवून कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवून ठेवतात.

• त्यानंतर वर्षभर आपल्या प्रक्रिया उद्योगात ती पुरवत असतात. येथील मिरची पावडरला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. देशभरातील अनेक शहरांमध्ये तिची निर्यात होत असते.

• नंदुरबारच्या बाजारात स्थानिक वाणांसह तेजा, व्याडगी, जीफोर, व्हीएनआरयासह इतर वाणांचा समावेश असतो. मिरची पथारींवरील लाल गालिचा आता कमी झाला आहे. ज्या काही पथारी आहेत तेथे मात्र रणरणत्या उन्हात मजूर काम करीत आहेत.

• या मजुरांना आणखी एक महिना काम मिळेल अशी शक्यता आहे. खरेदी केलेली मिरचीचे देठ काढणे, ती सुकवणे, गोळा करणे, पॅकिंग करणे आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये किंवा कोल्ड स्टोअरेजमध्ये पोओचविणे ही कामे केली जात असतात.

२ आठवडे ओली मिरचीची आवक सुरू राहणार

आवक सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा मिरची हंगाम मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ दिवस आधी हंगाम संपत आहे.

पाच महिने चालला हंगाम...

• यंदा मिरचीचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला होता. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे आवक उशिराने सुरू झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी हिरवी मिरची विकण्यावरच त्यामुळे भर दिला होता.

• नोव्हेंबर महिन्यात मात्र लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. दररोज शेकडो वाहने भरून येऊ लागली. लिलाव होऊ लागले आणि नंदुरबारचा परिसर लाल मिरचीच्या गालिच्याने भरू लागला. साधारणत चार ते साडेचार महिने मिरचीची उलाढाल येथील बाजारात दिसून आली.

• सध्या आवक कमी झाल्याने आता मिरची हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. किरकोळ आवक सुरू असून, आणखी एक ते दोन आठवडे ही आवक कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : 'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून उभे केले दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य; जाणून घ्या काय आहे विशाल यांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Red chili prices vary: Dry soars, powder stays high.

Web Summary : Nandurbar's chili season ends early due to reduced yield. Dry red chili prices are up to ₹12,000/quintal, impacting chili powder costs. Unseasonal rain also hurt crops.
टॅग्स :बाजारमिरचीविदर्भमार्केट यार्डभाज्याशेतकरीशेती क्षेत्र