साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी मिळाली. पण शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर पडलेलेच पाहायला मिळाले.
त्यामुळे नांदेड बाजार समितीत केवळ ४ हजार ३६५ कट्टे हळद खरेदी झाली. रविवारी सोन्याचे दर प्रतितोळा ९३ हजारांवर पोहोचले होते. तर हळदीला कमाल १४, ९११ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गतवर्षी १७ हजारांवर भाव मिळाला होता. तेच सोन्याचे भाव ७३ हजारांवरून ९३ हजारांवर पोहोचले आहेत.
मराठी नववर्षाला शेतकरी आपल्या नवीन कामांना प्रारंभ करीत असतो. शेतातील सालदार (गडी) बदलण्यापासून ते पुढील हंगामाचे नियोजन आणि शेतमाल विक्रीलाही गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत असतो. परंतु यंदाच्या या मुहूर्तावर हळद उत्पादक शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
मागील वर्षी पाडव्याला प्रतिक्विंटल १७ हजार ५ रुपये भाव नांदेडच्या बाजार समितीत मिळाला होता. यंदा मात्र हदळीचे उत्पादन घटलेले असतानाही अधिकचा भाव मिळाला नाही.
रविवारी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीटात हळदीला सरासरी १३ हजार ९९० रुपयांचा भाव मिळाला, तर कमाल भाव १४ हजार ९११ आणि किमान भाव ११ हजार २९० प्रतिक्विंटल होता.
गेल्या वर्षी एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पन्न मिळाले होते. परंतु यंदा हळद उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. उतारा अधिक येत नसल्याने बाजारपेठेतील आवकदेखील घटलेली आहे.
त्यामुळे भाव अधिक मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे पाडव्याचा मुहूर्त साधून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बीटात हळद आणली होती.
मात्र अपेक्षेप्रमाणे तसेच गतवर्षीपेक्षाही कमी भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना आपला माल तसाच ठेवला. केवळ मुहूर्तावर एखाद दोन कट्टे विक्री केले. त्यामुळे दिवसभरात केवळ ४ हजार ३६५ कट्टेच खरेदी झाले आहेत. दरवर्षी पाडव्यापर्यंत एक लाखाहून अधिक कट्टे हळदीची आवक होत असते. मात्र यंदा त्यात घट झाली.
रविवारी नांदेडातील बीट सभापती संजय लहानकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपसभापती भुजंगराव डक, संचालक सदाशिवराव देशमुख, सचिव एम. पी. पाटील, बी. एस. शेळके आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
• राज्यात सांगलीनंतर हिंगोली, वसमत आणि नांदेड येथील हळदीचे मार्केट चर्चेत असते. त्याप्रमाणे हळदीची आवकही असते. मात्र, नांदेडसह हिंगोली आणि वसमत येथेही हळदीला अपेक्षित भाव मिळाला नाही. नांदेडमध्ये सरासरी १३ हजार ९९०, तर जास्तीत जास्त १४ हजार ९११ रुपये भाव मिळाला.
• शेजारील हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीटमध्ये प्रतिक्विंटल १५ हजार ६५० रुपये सर्वाधिक भाव मिळाला. तर सरासरी १३ हजार रुपये भाव मिळाला.
• मागील वर्षी हळदीला १७ हजारापेक्षा अधिक भाव मिळाला होता. त्यात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु गतवर्षीपेक्षाही कमी भाव मिळाला.