हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार दिवसांपासून नवीन भुईमूग शेंगांची आवक होत आहे. सध्या ५ हजार ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव मात्र लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील हिंगोली आणि सेनगाव तालुक्यात सिंचनाची फारशी सोय नसल्यामुळे उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र अत्यल्प असते. तर वसमत, कळमनुरी आणि त्या खालोखाल औंढा नागनाथ तालुक्यात भुईमुगाचा पेरा होतो. आठवडाभरापासून बहुतांश भागात भुईमूग काढणीस प्रारंभ झाला असून, शेतकरी भूईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी मोंढ्यात आणत आहेत. सध्या २०० ते ३०० क्विंटलची आवक होत असून, किमान ५ हजार ते ५ हजार ८०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.
बहुतांश भागातील भुईमूग काढणीला प्रारंभ झाला असला, तरी शेंगा वाळल्याशिवाय विक्रीसाठी आणता येत नाहीत. अन्यथा भाव कमी मिळतो. येणाऱ्या दिवसांत शेंगांची आवक वाढणार आहे. मात्र, भाव कायम राहतो की पडतो? हे सध्या तरी सांगता येणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मोंढ्यातील भुईमूग शेंगांची आवक...
दिनांक | आवक (क्विं.) | सरासरी भाव |
०५ मे २०२५ | २०० | ५,५०० |
०६ मे २०२५ | ३०० | ५,६६५ |
०७ मे २०२५ | १९० | ५,२०० |
०८ मे २०२५ | २२० | ५,५५० |
०९ मे २०२५ | २१९ | ५,२०० |
१० मे २०२५ | २०० | ५,५०० |
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या