Join us

कोल्हापूर बाजार समितीत चक्क नोव्हेंबरमध्येच हापूसची आवक; वाचा बॉक्सला काय मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:48 IST

devgad hapus mango market कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचा राजा 'देवगड हापूस'ची आवक झाली असून, सोमवारी त्याचा सौदा काढण्यात आला.

कोल्हापूर : कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचा राजा 'देवगड हापूस'ची आवक झाली असून, सोमवारी त्याचा सौदा काढण्यात आला.

यामध्ये चौदा नगाच्या बॉक्सला तब्बल ४२०० रुपये भाव मिळाला. यंदा सतत पाऊस असतानाही चक्क नोव्हेंबरमध्येच हापूसची आवक झाली आहे.

आपल्याकडे साधारणतः जानेवारी महिन्यापासूनच हापूस आंब्याची आवक सुरू होते. आंब्याची आवक व दरदाम हे हवामानावर अवलंबून असते.

यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू आहे. हवामान खराब असल्याने हापूसची आवक लांबणीवर पडणार असाच अंदाज होता.

पण, देवगड येथील प्रकाश शिरसेकर यांच्या पाच बॉक्स 'देवगड हापूस' आंब्याची आवक जावेद इब्राहिमभाई बागवान यांच्या अडत दुकानात झाली. उच्चांकी प्रतिबॉक्स ४२०० रुपये दराने सलीम बागवान व आफान बागवान यांनी खरेदी केले.

त्याचा सौदा सभापती सूर्यकांत पाटील, संचालक सुयोग वाडकर, नाना कांबळे, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील फळ विभागप्रमुख अनिल पाटील, सुहेल बागवान, इरफान बागवान, मोहसीन बागवान उपस्थित होते.

एवढ्या लवकर हापूसची आवक होत नाही, पावसातही देवगड हापूसची आवक झाली. नियमित आवक जानेवारीपासूनच होईल, असा अंदाज आहे. - तानाजी दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाजार समिती

अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डकोल्हापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीहापूस आंबाशेतकरीशेतीहवामान अंदाज