दरीबडची : पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यामुळे जत तालुक्यात पुढील वर्षाच्या सुरुवातील चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज आहे.
सध्या चिंचेच्या झाडाला मोठ्या संख्येने चिंचा लगडल्या आहेत. यंदा २०२५ सालच्या हंगामात तुलनेपेक्षा चिंचेचे उत्पादन कमी झाले होते.
चांगल्या उत्पादनामुळे चिंचेला यंदा चांगला भाव मिळणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत उन्हाळी बोनस मिळण्याची आशा आहे.
चिंच हंगामाची सुरुवात मकरसंक्रांतीला सुरुवात होते. मे महिन्यात त्याची सांगता होते. व्यापाऱ्यांसाठी २०२६ च्या उन्हाळी हंगाम चांगला ठरण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशसह दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी असते. चिंचेला यंदा दर्जानुसार किलोला ४० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात चिंचेची प्रत चांगली आहे.
येथील चिंचेला पिवळसर रंग असल्यामुळे व्यापाऱ्यांची याला अधिक मागणी असते. तालुक्यात शेतीच्या बांधावर, वस्तीवर, पाटालगत, ओढ्यालगत कालव्याच्या कडेला, पडीक क्षेत्रावर चिंचेची झाडे मोठ्या संख्येने आहेत.
चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व
चिंचेच्या १०० ग्राम गरांमध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, क जीवनसत्व ३ ग्रॅम इतके प्रमाण असते. विविध विकारांमध्ये चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे.
बहुगुणी चिंच
चिंचेला 'भारतीय खजूर' म्हणून संबोधण्यात येते. चिंचेचा सार, कोळ, चटणी, अर्क, गर, पावडर, पन्हे, सरबत तसेच आयुर्वेदिक औषधाकरिता उपयोग होतो. चिंचोकेपासून खळ, पावडर, बुक्का, कुंकू निर्मिती होते.
इतिहासातील चिंच लागवड
म्हैसुर संस्थानात चिंच लागवडीत प्राधान्य दिल्याची नोंद आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर संस्थानात ३०० वर्षांपूर्वी सुमारे ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेची झाडे लावण्यात आल्याचे दाखले आहेत. उत्पादनाची लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आढळते.
अधिक वाचा: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
