रशियाने सूर्यफूल तेलावरील निर्यात शुल्कात प्रतिकिलो सव्वा रुपये वाढ केल्याने त्याचा परिणाम सध्या बाजारपेठेवर दिसत आहे. सूर्यफूल तेलाच्या दरात प्रतिकिलो आठ रुपयांची वाढ झाली आहे. आयात शुल्क वाढीबरोबरच रशिया-युक्रेन संघर्षांचीही दरवाढीला धग दिसत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रशिया हा जगातील सर्वात मोठा सूर्यफूल तेल निर्यातदार आहे. येथील बाजारपेठेवर जगातील सर्व देशांच्या खाद्यतेलाच्या दरावर परिणाम जाणवतो. रशियामधील खाद्यतेलाच्या किमती स्थिर राहाव्यात, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
पण, त्याचा परिणाम भारतात दिसत आहे. त्यांनी निर्यात शुल्क ऑगस्ट २०२८ पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय बाजारपेठेवर होणार हे निश्चित आहे. यांसह येत्या काळात इतर खाद्यतेलांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर तेल कंपन्यांची मखलाशी
• सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाल्याने इतर खाद्यतेलाच्या कंपन्यांची मखलाशी पाहावयास मिळते.
• साधारणता बाजारात २१० ग्रॅमचा एक लिटर असतो. मात्र, काही कंपन्यांनी ८०० ग्रॅमची पिशवी करुन दर तोच ठेवल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
किरकोळ बाजारातील खाद्यतेलांचे दर (प्रतिकिलो)
| खाद्यतेल | दर |
| सूर्यफूल | १८० |
| सोयाबीन | १५६ |
| सरकी | १५८ |
| शेंगदाणा | १८४ |
रशियाच्या निर्यात शुल्क वाढवण्यामागील कारणे
• तेलबिया देशातच प्रक्रिया करून तेल आणि पेंड तयार करण्याला प्रोत्साहन देणे. देशांतर्गत खाद्यतेल बाजारात किमती स्थिर ठेवणे आणि नागरिकांसाठी तेल सहज उपलब्ध करणे.
• पशुखाद्यासाठी लागणाऱ्या सूर्यफूल पेंडीची उपलब्धता मुबलक करून देणे. या धोरणांमुळे बाजारपेठेत दीर्घकाल स्थिरता आणि अंदाज बांधता येणे शक्य होते.
रशियाने निर्यात शुल्कात वाढ केली. याबरोबरच रशिया-युक्रेन संघर्षाची झळही सध्या सूर्यफूल तेलाच्या मार्केटला बसली आहे. त्यामुळे दरात वाढ दिसत आहे. - हितेश कापडिया, खाद्यतेलाचे व्यापारी, कोल्हापूर.
