उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की, महिलांची वाळवणांसाठी लगबग सुरू होते. सध्या त्यासाठी पोषक वातावरणही आहे.
त्यामुळे बहुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे 'होममेड' वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, बाजारात आवक वाढली आहे.
ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून बटाटे विकत घेत असल्याने १६ ते १७ रुपये प्रतिकिलो दराने पडत आहे. तोच बटाटा किरकोळ बाजारात प्रतिकिलो २० ते २५ रुपयांपर्यंत आहे.
पुणे कृषि उत्पन्न बाजारसमितीत बटाट्याला प्रति क्विंटल किमान १४००, कमाल २२०० तर सरासरी १८०० रुपये इतका भाव मिळतो आहे. ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे पसंत करता आहेत.
उन्हाळ्यात घरगुती व व्यावसायिक स्वरूपात वाळवणाचे पदार्थ बनविले जातात. यात पापड, कुरडई, शेवया, बटाटा चिप्स, चकल्या अशा विविध पदार्थाचा समावेश असतो. या पदार्थांसाठी बटाटा हा मुख्य सामग्री आहे. स्वयंपाकासोबत वाळवणाच्या पदार्थासाठीही बटाट्याला मागणी वाढलेली आहे.
अशी केली जाते तयारी
भल्या पहाटे बटाटे उकडले जातात. थंड झाल्यावर त्याची साल काढून कुस्करले जातात. आवश्यकतेनुसार पदार्थ बनवून कडक उन्हात सुकवले जातात. वाळवणाच्या पदार्थासाठी लागणारा बटाटा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे बटाट्याला मागणी वाढली आहे.
मागणी वाढल्यामुळे शेतकरीही त्यांनी लागवड केलेला बटाटा बाजारात विकण्यासाठी काढणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याची आवकही चांगली होणार आहे. आवक वाढल्यानंतर ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बटाट्यापासून उन्हाळी पदार्थ बनविण्यास महिलांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठ्या बटाट्याला अधिक मागणी आहे. शहरातील ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून बटाटे घेत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचत आहे व ग्राहकांनाही बाजार भावापेक्षा स्वस्त बटाटा मिळत आहे. - अक्षय भसे, शेतकरी, सांगुर्डी गाव