सध्या राज्याच्या बऱ्याच शहरांत १०० ते १५० रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी चक्क ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारली आहे. फळबाजारात चांगल्या प्रतीचे सफरचंद १०० ते २०० रुपये किलोपर्यंत आहेत. परंतु, शेवगा यापेक्षाही महाग झाला आहे.
सध्या बाजारात पाव किलोच्या पारड्यात १०० रुपयांत केवळ सहा ते सात शेंगा भरत आहेत. हिवाळ्यात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. मात्र, लांबलेल्या पावसाळ्यामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात २०० ते २५० रुपयांचा दर
जून-जुलैमध्ये शेवगा ८० रुपये किलो होता. त्यानंतर शेवग्याने शंभरी गाठली. स्थानिक आवक कमी असल्याने इतर ठिकाणाहून पुरवठा होत आहे. परिणामी गत महिन्यात २०० ते २५० रुपये किलो भाव होता.
शेवग्याचे भाव चारशेवर
• अतिवृष्टीमुळे शेवग्याची दोन महिन्यांपासून परजिल्ह्यातून आवक होत आहे. ही आवक आजही सुरूच आहे.
• भाव तेजीत असून, वाहतूक खर्च पाहता शेवग्याचा भाव चारशेवर पोहचला आहे.
शेवग्याच्या भावात तेजी कशामुळे?
बदलत्या हवामानामुळे, तसेच मागील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीचा परिणाम शेवगा उत्पादनावर झाला आहे. उत्पादन कमी आणि थंडीच्या दिवसांत वाढत्या मागणीमुळे शेवग्याच्या दरात तेजी आल्याचे विक्रेते सांगतात, या वाढलेल्या दरामधील शेवग्याच्या शेंगा खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली असून, यामुळे खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
रोजच्या आहारात आवश्यक असल्याने भाज्या खरेदी कराव्याच लागतात. पालेभाज्या व फळभाज्या येथील मंडईत दररोज ताजे मिळतात. परंतु, महिनाभरापासून शेवग्यासह सर्वच भाज्यांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. - कैलास जोशी, ग्राहक, बीड.
बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले
| भाजीपाला | दर |
| टोमॅटो | ८० |
| बटाटा | ४० |
| वांगी | ८० |
| भेंडी | १०० |
| दोडका | १०० |
| फ्लॉवर | १०० |
| पत्ता कोबी | ८० |
| कारले | ८० |
| गवार | १६० |
| वाल | ८० |
घरापासून ढाब्यांपर्यंत सर्वत्र मागणी
रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, म्हणून भाजीच्या टोपलीत शेवग्याचे वेगळे स्थान आहे. पौष्टिक असल्याने शेवगा मसाला फ्राय, आमटी, रस्साभाजीसाठी घरापासून ते ढाब्यांपर्यंत शेवग्याला मागणी आहे.
ग्राहकांना भुर्दंड
महिनाभरापासून शेवग्यासह सर्वच भाज्यांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.
कॅल्शियम, लोह, व्हिटामिन सीचा खजिना
शेवग्यातून प्रोटीन, अमिनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कैल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस मिळते. बी, सी, ई जीवनसत्वे शेवग्यात असतात. आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक घटकांचा खजिना शेवग्यात आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो शेवगा
आहारात शेवगा नियमित खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. हाडे मजबूत होतात. मधुमेहावर नियंत्रण राहते, तसेच पचन सुधारते.
वाढत्या थंडीमुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. परंतु, मागणी असल्याने व्यापारी छत्रपती संभाजीनगर, ओतुर, राहुरी, भूम, वाशी भागांतून भाज्यांची आवक होत आहे. पालेभाज्यांची आवक मात्र दोन आठवड्यांपासून वाढली आहे. - हुजेब बागवान, बीड.
