हिंगोली : यंदा शासनाने सोयाबीनला जाहीर केलेल्या हमीभावामुळे (Guaranteed Price) शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. परंतु, शासकीय खरेदी केंद्रांवर प्रारंभापासूनच जाचक अटी, बारदाण्याचा तुटवडा अशा एक ना अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.
या केंद्रांना ३१ जानेवारीची 'डेडलाईन' (Deadline) असून, येत्या सात दिवसांत तीन हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीचे (Soybean Procurement) आव्हान असणार आहे.
अतिवृष्टीचा मारा, येलो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे खरीप हंगामातील सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत सोयाबीनला समाधानकारक भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पडत्या भावामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.
जिल्ह्यातील बाजार समितींच्या मोंढ्यात सोयाबीनचा भाव सरासरी ४ हजार ३०० रुपयांखालीच राहिला. तर जास्तीत जास्त ४ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला.
तर शासनाकडून जाहीर केल्यानुसार ४ हजार ८९२ रुपयांचा दर 'एनसीसीएफ'च्या खरेदी केंद्रांवर देण्यात येत आहे. त्यामुळे क्विंटलमागे जवळपास ५०० ते ६०० रुपयांचा भाव वाढून मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करणे पसंत केले.
परंतु, या केंद्रांवर प्रारंभापासून बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मध्यंतरी खरेदी मंदावली होती. त्यानंतर काही दिवस शेतकऱ्यांचा बारदाना वापरण्यात आला.
आता बारदाना उपलब्ध झाला आहे. परंतु, केंद्राची मुदत संपायला केवळ सात दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन नोंदणी केलेल्यांपैकी २ हजार ७४१ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे केंद्रांसमोर आव्हान आहे.
२ लाख ८० हजार १६२ क्विंटलची खरेदी
* जिल्ह्यातील १५ शासकीय खरेदी केंद्रावर २३ जानेवारीपर्यंत २ लाख ८० हजार १६२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती पणन विभागाच्या वतीने देण्यात आली.
* यंदा बाजार समितीच्या मोंढ्यात, खुल्या बाजारात सरासरी चार हजारावर सोयाबीनला भाव मिळाला नाही. तर शासकीय खरेदी केंद्रांवर ४ हजार ८९२ रूपये भाव देण्यात आला. त्यामुळे यंदा या केंद्रांवर विक्रमी खरेदी झाली.
७२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात
शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी झालेल्या २,८०,१६२ पैकी १,४७,१२८ क्विंटल सोयाबीनचे ७१ कोटी २७ लाख ५२ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
२५,९१६ शेतकऱ्यांनी केली ऑनलाइन नोंदणी
'एनसीसीएफ' अंतर्गत शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील २५ हजार ९१६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार १७५ शेतकऱ्यांना केंद्रांच्या वतीने एसएमएस पाठविण्यात आले असून, यातील बहुतांश शेतकन्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. तर आता २ हजार ७४१ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी शिल्लक आहे.
सोयाबीनची केंद्रनिहाय झालेली खरेदी
शेतकरी | केंद्र.. | खरेदी (क्विं.) |
९३५ | जवळा बाजार | १५२६०,५० |
८७६ | वसमत | १६७३३.९७ |
१०३८ | येहळेगाव | २०५२८.०० |
८७१ | कनेरगाव ना. | २२८८८.०० |
८०५ | कळमनुरी | १५२७८,०० |
५६५ | वारंगा | १०९०३,०० |
६९३ | साखरा | १४५८४,०० |
१५९९ | सेनगाव | ३७६१२.५० |
९४० | हिंगोली | २१३८२.९३ |
७१६ | शिवणी खु. | १३१३४,०० |
१०६७ | फाळेगाव | २१५८५.५० |
११५३ | सिनगी नागा | २६९४६.५० |
११६८ | आडगाव | २१०७१.५० |
२०३ | उमरा | ३७३३.५० |
९१५ | पुसेगाव | १८५१९.८० |