सांगली : शेतकऱ्यांसाठी आता सोयाबीन हमीभावापेक्षा कमी, म्हणजे दीड ते दोन हजार रुपयांनी कमी दरात खासगी बाजारात विक्री करण्याची वेळ आली आहे.
यामुळे शासनाने सर्व बाजार समित्यांकडून हमीभाव केंद्रे सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. सांगली बाजार समितीने कवठे महांकाळ, सांगली व जत येथे हमीभाव केंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे.
एका बाजूला शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन पीक साठवले असताना, दुसऱ्या बाजूला शासनाकडून अजूनही शासकीय खरेदीची सुरुवात झालेली नाही.
शेतकरी संघटनांनी राज्य शासनाच्या पणन विभागाकडे हमीभाव केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सर्व बाजार समित्यांना कुठे आणि कोणत्या पिकांचे उत्पादन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू करावीत, याबाबत विचारणा केली आहे.
सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे म्हणाले की, सोयाबीन, तूर, मका या पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्रे प्रस्तावित करण्याचा विचार आहे.
कवडीमोल भावाने विक्री
◼️ शासनाने यंदा सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ३३६ रुपयांनी अधिक आहे.
मात्र, बाजारात सध्या सोयाबीनचे दर ४,००० ते ४,२०० रुपये प्रति क्विंटलदरम्यान आहेत.
◼️ त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,५०० ते २,००० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
◼️ गरजू शेतकऱ्यांना आपला सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात खासगी बाजारात विक्री करण्याची वेळ आली आहे.
अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली. त्यांनी शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने हमीभाव केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.
