Join us

Solapur Onion Market : तीन दिवसांनी सोलापूर कांदा मार्केट सुरळीत सुरु, ४७२ ट्रक कांद्याची आवक; कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:46 IST

Solapur Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांनंतर शेतकऱ्यांना कांदा आला. सोमवारी सुमारे ४७२ ट्रक कांद्याची आवक झाली. हमाल कामगार कामावर रुजू झाल्याने लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांनंतर शेतकऱ्यांना कांदा आला. सोमवारी सुमारे ४७२ ट्रक कांद्याची आवक झाली. हमाल कामगार कामावर रुजू झाल्याने लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली.

दरात किंचित घसरण झाली असून, एका दिवसात साडेआठ कोटींची उलाढाल झाली आहे. सोलापूर बाजार समितीत हमालांच्या संपामुळे कांदा लिलाव गुरुवार आणि शनिवार बंद ठेवण्यात आला होता.

गुरुवार आलेल्या मालाचा शुक्रवार लिलाव झाला होता. शुक्रवारी हमालांनी माल न उलचल्यामुळे शनिवारी लिलाव झाला नाही. मात्र, प्रशासकांनी बैठक घेऊन यापुढे संप करताना ४८ तास अगोदर बाजार समितीला न कळविण्यास हमालांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार सोमवारी हमाल नेहमीप्रमाणे कामावर आले होते. त्यामुळे रविवारी रात्री आलेला कांदा हमालांनी उतरविला. सकाळी लिलाव झाला. दुपारनंतर हमालांनी पुन्हा माल भरून बाहेर पाठविला. त्यामुळे सोमवारी दिवसभर कारभार सुरळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील इंडी विजयपूर, कलबुरगी, आळंद, बिदर या भागातील शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आला होता. शुक्रवारच्या दराच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांपर्यंत दर कमी झाल्याचे सांगण्यात आले.

चांगल्या गरवा मालाला ४५२७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. इतर मालाला ३००० हजारांपर्यंत दर होता. सरासरी भाव मात्र १८०० रुपयांपर्यंत मिळाला.

जानेवारीपासून आणखी आवक वाढणारजानेवारी महिन्यापासून आवक वाढण्याची शक्यता आहे. कारण, शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. शिवाय कॅनॉल आणि नदीला पाणी सोडल्यामुळे दिवाळीनंतर कांद्याची लागवड झाली आहे. त्यामुळे जानेवारीपासून पुढील तीन महिने सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी आवक वाढली होती. दरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. वाळवून आणलेल्या चांगल्या दर्जाच्या मालाला दर चांगला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड करून कच्चामाल विक्रीसाठी आणू नये. दर कमी मिळाल्यास मोठा फटका बसतो. - सद्दोजात पाटील, कांदा व्यापारी, सोलापूर

टॅग्स :कांदामार्केट यार्डबाजारसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीकशेतकरी