Join us

Solapur Market Yard : सोलापूर मार्केट यार्डात तीन दिवस लिलाव बंद; वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 10:29 IST

Solapur Apmc Market Yard : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्यासह शेतीमालाचा लिलाव होणार नाही.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्यासह शेतीमालाचा लिलाव होणार नाही.

दरम्यान, शनिवारी ४५८ ट्रक कांद्याची आवक झाली असून, दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सरासरी दर साडेतीन हजारांवरून आता चौदाशे रुपयांपर्यंत खाली आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय तूर, सोयाबीन या भुसार मालासह डाळिंब, बोर, द्राक्ष आदी फळांची व पालेभाज्या फळभाज्यांचीही आवक सुरू आहे. दि. १२ जानेवारी रोजी रविवार असल्याने मार्केट बंद राहणार आहे.

१३ जानेवारी रोजी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळा व १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त मार्केट यार्डातील कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आता थेट १५ जानेवारीपासून मार्केट यार्डातील कामकाज सुरू होणार आहे. 

दरम्यान, शनिवारी सोलापूर मार्केटमध्ये जवळपास ४५८ कांद्याची आवक झाली होती. चांगल्या कांद्यालाही सध्या दर कमीच मिळत आहे. मागील महिन्यात आठ हजार रुपये प्रतिक्विंटल विकला जाणारा कांदा आता साडेतीन हजार रुपयाला जात आहे.

सरासरी दरातही मोठी घसरण झाली आहे. चार हजार ते साडेतीन हजार रुपये दर मिळत होता. मात्र, शनिवारी सरासरी दर १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

कच्चामाल आणू नये

सध्या कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, चांगल्या कांद्याला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कच्चामाल विक्रीसाठी आणू नये. कांदा पूर्णपणे वाळवून आणल्यास दरही चांगला मिळतो पुढील काही दिवस दर कमीच राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी आवक वाढण्याची शक्यता

तीन दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे बुधवारी मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच दिवशी माल काढू नये त्यामुळे नियोजन करण्यात अडचणी निर्माण होतील शिवाय दरात ही घसरण होऊन आर्थिक नुकसान होईल, याचा विचार करून शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Tomato Farming Success Story : एकरभर फळबागेवर भारी पडले टोमॅटो; वीस गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न घेणारे शिवहार पाटील

टॅग्स :बाजारसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकांदाशेतकरीमार्केट यार्ड