Join us

जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 11:00 IST

Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे.

ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. चारा खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने जनावरांचा सांभाळ कसा करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

शेतीला पूरक जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. खिल्लार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात गाय-बैल ७० हजार ९१६, म्हैशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ आहे. हजार ९६४, मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७, अशी एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ जनावरे आहेत. ५ लाख ५१ हजार ९९७ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. 

सध्याच्या घडीला ३ लाख ७ हजार टन चारा शिल्लक आहे. तो पुरेसा नाही. चारा नियोजन, उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती कृषी विभागाकडे नाही. ज्वारीचा कडबा जनावरांसाठी पौष्टिक आणि दमदार चारा असतो. शेतकरी दुसऱ्या गावातून चारा खरेदी करत आहेत. गेल्या वर्षाचा चारा संपला आहे. यावर्षी ज्वारीची पेरणी कमी झाली.

दुभती जनावरे संकटात

पाण्याअभावी शेतात ओला चारा नसल्याने दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. ओल्या चाऱ्याअभावी दूध संकलनात घट झाली आहे.

जत तालुक्यात सध्या चारा टंचाई भासू लागली आहे. चाऱ्याअभावी जनावरे संकटात सापडली आहेत. कडव्याचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना जनावरे जगवणे अवघड झाले आहे. विकतचा कडबा घेऊन जनावरे जगविण्याशिवाय पर्याय नाही. - रावसाहेब सबई, संख, पशुपालक

४ वर्षातील कडबा किमत

वर्ष पेंढीची किंमत 
२०२३ १३ ते १५ रुपये 
२०२४ १५ ते १८ रुपये 
२०२५ २० ते २२ रुपये 

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीदुग्धव्यवसायगायसांगलीबाजार