तुकडा तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय भारतसरकारने शनिवारी जाहीर केला. सप्टेंबर २०२२ मध्ये ही बंदी सरकारने लादली होती.
विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात बदल करण्यात आला असून, हा तांदूळ निर्यातीच्या प्रतिबंधित श्रेणीतून मुक्त श्रेणीत टाकण्यात आला आहे.
हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, देशांतर्गत तांदळाचे साठे वाढल्यामुळे निर्यातीला परवानगी देण्याची मागणी निर्यातदारांनी अलीकडेच केली होती.
गेल्या वर्षी सरकारने बिगर-बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवरील प्रतिटन ४९० डॉलरच्या निर्यात किमतीचे बंधन काढून टाकले होते.
वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने गांबिया, बेनिन, सेनेगल आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांना १९४.५८ दशलक्ष डालरचा तुकडा तांदूळ निर्यात केला होता.
हा आकडा २०२२-२३ मध्ये ९८३.४६ दशलक्ष डॉलर, तर २०२१-२२ मध्ये १.१३ अब्ज डॉलर इतका होता.