Join us

रमजानची मागणी घटली त्यात अवकाळीच्या नुकसानीची भिती; केळी दर गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:27 IST

Banana Market Rate Update : गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पावसाचे भाकीत वर्तवल्याने आणि रमजानचीही समाप्ती झाल्याने केळी भाव घसरले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षाच्या मानाने यावर्षी केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सुरुवातीला दोन हजार ते दोन हजार २०० रुपये प्रति क्विंटल केळीला भाव भेटत होता.

गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पावसाचे भाकीत वर्तवल्याने आणि रमजानचीही समाप्ती झाल्याने भाव घसरले आहेत.

परिणामी अनेक शेतकरी केळीचे नुकसान होऊ नये व हाता तोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून मिळेल त्या भावात केळीच्या बागा व्यापाऱ्यांना ठोक भावात देत आहेत.

या अवकाळी पावसाचा भाकीतचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सध्या व्यापारी केवळ एक हजार १०० ते एक हजार २०० रुपये प्रतिक्विंटलने केळी खरेदी करताना दिसून येत आहेत.

गेल्या दोन वर्षात केळी पिकाला दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे भाव भेटला होता. यावर्षीही सुरुवातीला दोन हजार रुपये प्रति क्विंटलने केळी खरेदी केली जात होती.

नुकसान होऊ नये म्हणून मिळेल त्या भावात विक्री...

• सध्या केवळ एक हजार १०० ते एक हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा दर भेटत असल्याने केळी उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांची केळी तयार झाली आहे.

• व्यापारी अवकाळी पावसाचा भाकितचा फायदा तसेच शेतकऱ्यांची गरज ओळखून पंधरा दिवसांपूर्वी दोन हजार रुपये प्रति क्विंटलने जाणारी केळी सध्या निम्म्या भावाने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडला आहे.

• ऐनवेळी केळीला खूपच कमी प्रमाणात दर भेटत असल्यामुळे या दरामध्ये एकरी ६० ते ७० हजार रुपये लावलेले भांडवल निघणे मुश्किल असल्याचे दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा : शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा 'ही' प्रक्रिया; उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता

टॅग्स :केळीबाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीपाऊसजळगावविदर्भ