Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरी हळद खातेय भाव; युद्धजन्य परिस्थिती असूनही 'या' बाजारात हळदीचे दर तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:22 IST

halad market आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे.

सांगली : आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली तरी सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डातील हळद बाजार मात्र तेजीत आहे.

हळदीची आवकही वाढली आहे. दर्जेदार मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याने मंगळवारी हळदीला समाधानकारक दर मिळाले.

चांगल्या प्रतीच्या चोरा हळदीने प्रतिक्विंटल ३६ हजारांचा टप्पा गाठला आहे. हळदीला कमीतकमी प्रतिक्विंटल १२ हजार रुपये दर मिळत आहे.

सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डात मंगळवारी राजापुरी हळदीची एकूण तीन हजार ७९६ पोत्यांची आवक झाली. बाजारात मालाची आवक मध्यम असली तरी दर्जेदार हळदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चांगली स्पर्धा दिसून आली.

परिणामी, चांगल्या प्रतीच्या चोरा हळदीला प्रतिक्विंटल २५ हजार ते ३६ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. या दरामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राजापुरी लंगडी हळदीलाही बाजारात चांगली मागणी दिसून आली. या प्रकाराला प्रतिक्विंटल १७ हजार ५०० ते २६ हजार २०० रुपये दर मिळाला.

तर इतर प्रकारच्या हळदीलाही तुलनेने स्थिर दर मिळाले. बाजारात येणाऱ्या मालाच्या दर्जानुसार दरांमध्ये चढ-उतार होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे.

हळदीचा वापर मसाला उद्योगासह औषधी आणि प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बाजारात दर टिकून असल्याचे व्यापारी सांगतात.

बाजारातील दरांचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत असतो. सध्या दर्जेदार मालाला मिळणारे उच्च दर पाहता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आगामी काळातही बाजारातील मागणी कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

असे आहेत हळदीचे दरहळदीचा प्रकार - दर (प्रतिक्विंटल)◼️ राजापुरी कणी - १२,००० ते १४,००० रुपये.◼️ राजापुरी पावडर दर्जा - १४,३०० ते १६,००० रुपये.◼️ राजापुरी लंगडी - १७,५०० ते २६,२०० रुपये.◼️ राजापुरी गठ्ठा - १२,५०० ते १६,००० रुपये.◼️ चोरा हळद - २५,००० ते ३६,००० रुपये.

युद्धाचा सध्या तरी हळदीच्या बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल ३६ हजार तर कमीतकमी १२ हजार रुपये दर मिळत आहे. हळदीची आवक वाढली असून, उलाढालही चांगली होत आहे. - महेश चव्हाण, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली

अधिक वाचा: यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Rajapuri Turmeric Prices Soar Despite War; Market Thriving

Web Summary : Sangli's turmeric market thrives despite war concerns, with increased supply and high demand for quality. Chora turmeric reached ₹36,000/quintal. Farmers are pleased with the prices, expecting continued market stability due to domestic demand from spice, medicinal, and processing industries.
टॅग्स :मार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसांगलीयुद्धशेतकरीशेती