पुणे : भारतीय संस्कृतीत 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' असे म्हणत स्नेह जपण्याची परंपरा असल्याने या काळात घराघरांतून तिळाच्या लाडवांची आणि वड्यांची लगबग पाहायला मिळते.
निवडणुकीच्या रणधुमाळीत नागरिकांना प्रचारात मतदारांना खूश करण्यासाठी आणि स्नेह वाढविण्यासाठी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळगूळ मागणी वाढली आहे. मकरसंक्रांत सण येत्या (दि. १४) बुधवारी आहे.
'तिळगूळ द्या, गोड बोला...' असा संदेश देत मतदारांच्याबरोबर पोहोचवण्यासाठी तिळगूळ खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगूळ, बांगड्या बाजारामध्ये विक्रीला आल्या आहेत.
यांसह रेडिमेड तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, साखर तसेच गुळाची रेवडी, हळदी-कुंकवाचे वाण खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.
बाजारात तिळगूळ खरेदीसाठी दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकाने लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात खरेदीसाठी येत आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव थोडे वधारले असतानाही संक्रांतीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी तिळगुळाची खरेदी होत आहे.
तिळाचे लाडू २८० ते ३२० रुपये प्रतिकिलो, गुळाची रेवडी १८० ते २०० रुपये, १०० ते १२० रुपये किलो असे भाव असल्याचे व्यापारी सुनील पंजाबी यांनी सांगितले.
बाजारपेठेत तयार लाडू खरेदीसाठी कल वाढला
मकरसंक्रांतीला ग्राहकाकडून तयार लाडवांना पसंती मिळत आहे. नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या आणि वेळेचा अभाव यामुळे घरी लाडू वळण्यापेक्षा बाजारातून तिळाचे लाडू, चिक्की आणि वड्या विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ अत्यंत पोषक आणि आवश्यक घटक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीळ उत्पादन कमी झाले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे खराब मालाचे प्रमाण जादा असल्याने चांगल्या प्रतीच्या तिळाला मागणी अधिक असून दरही वाढले आहेत. मागणी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी तीळ आणि गुळाच्या दरात १०% ते २०% वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः गावरान तिळाचे भाव वाढले आहेत. - अजित बोरा, तिळाचे व्यापारी मार्केट यार्ड
अधिक वाचा: आता तलाठ्यांकडचे हेलपाटे वाचणार; ई हक्कद्वारे 'या' ११ प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध
