दिनेश लिंबेकर
लग्नसराई आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर फुले आणि पुष्पहारांच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे उत्पादन घटल्याने आवकही मर्यादित आहे.
गुलाब फुलांचा भाव ५०० रुपये, तर मोगऱ्याचा भाव ८०० च्या घरात गेला आहे. साधा बुके सुद्धा २०० रुपयांना मिळत आहे. मोगऱ्याचे भाव आणखी दोन दिवसांनी वाढणार आहेत.
नांदेड येथून मोगरा आयात
• नांदेड येथून बीड शहरात मोगरा आयात केला जात असून, किलोचा भाव ८०० रुपयांवर गेला आहे.
• लग्नसराई आता शेवटच्या टप्प्यात आल्याने आणखी दोन दिवसांनी मोगऱ्याचे भाव वाढणार आहेत.
• संगमनेर येथून शिर्डी गुलाब, तर पुण्यातून डच गुलाब बीडला आयात होत आहे. सध्या गुलाबाचा भाव ५००च्या घरात आहे.
लग्नसराईमुळे फुलांचे भाव गगनाला
चालू महिन्यात सर्वाधिक लग्न तारखा असल्याने ग्राहकांकडून मागणी अधिक वाढल्याने सध्या गुलाबाबरोबरच मोगरा, झेंडू, पांढरी शेवंती, गुलाबी शेवंती या फुलांचे भावही सध्या वाढलेले आहेत.
| फुलाचा प्रकार | किलोचा भाव |
| गुलाब | ३५० ते ४०० |
| मोगरा | ८०० ते ९०० |
| झेंडू | ५५० |
| पांढरी शेवंती | २०० |
| गुलाबी शेवंती | १८० |
साधा बुकेही दोनशेच्या पुढे
बीडमध्ये साधा बुके शंभरपासून ७०० रुपयापर्यंत मिळत आहे. बुकेचा भाव फुलांच्या वापर सजावटीवर अवलंबून आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार विविध बुके विकले जातात. सध्या बाजारात ५०० ते ७०० रुपयांच्या राउंड बुकेला मागणी आहे, असे इव्हेंट सजावटकार सचिन पवार यांनी सांगितले.
शहरात कुठून आवक ?
बीड शहरात जालना, पुणे, संगमनेर, नगर ठिकाणांहून फुले येत आहेत. नगरहून शेवंती, संगमनेर येथून शिर्डी गुलाब, पुण्याहून डच गुलाब, जालना येथून गलांडा, झेंडू, तर नांदेड येथून मोगऱ्याची फुले येत आहेत.
डेकोरेशनमध्ये फुलांचा वापर क्वचित
• बीडमध्ये सध्या लग्नाच्या डेकोरेशनमध्ये फुलांचा वापर क्वचित प्रमाणात होत आहे.
• आर्टिफिशियल फुलांचा वापर अधिक होत आहे. लग्नातील केवळ सप्तपदी, रांगोळीसाठीच फुले सध्या वापरली जात आहेत.
लग्नसराईमुळे गुलाब, मोगऱ्याला मागणी अधिक
सध्या तापमानामुळे मालाचा तुटवडा आहे. लग्नसराईमुळे सध्या गुलाब व मोगऱ्याच्या फुलांना ग्राहकांची मागणी जास्त आहे. संगमनेर येथून येणारा शिर्डी गुलाबाचे भाव १५० पासून ४५० पर्यंत गेला आहे, तर डच गुलाबाची २० फुलांची पेंडी ४५० रुपयांना विक्री होत आहे. - शशिकांत गुगले, फुलविक्रेता, धोंडीपुरा, बीड.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
