गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.
राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५,३५४ हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली असून, उत्पादनक्षम क्षेत्र ४,८७५ हेक्टर आहे. हेक्टरी फळांची उत्पादकता ११,२५० फळे इतकी आहे. जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी पोषक असले तरी सर्वाधिक लागवड आंबा, काजू या पिकांची आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित होणारा नारळ अपुरा पडत असल्याने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथून आवक करावी लागते. अन्य राज्यांतील नारळाची आवक घटल्यामुळे स्थानिक नारळाच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रक्रिया उद्योगावर भर
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक राज्यात नारळावरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली आहे. नारळापासून उत्पादित तेल, दूध, चिप्स, पावडर शिवाय अन्य विविध वस्तूंची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे परराज्यांतून नारळाची आवक कमी होत असल्याने स्थानिक भागात नारळाचे भाव वधारले आहेत.
उत्पादनात घट
बदलत्या हवामानासह कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय माकडे नारळाचे नुकसान करीत असल्याने उत्पादकता घटली आहे.
उच्चत्तम दर
२० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ सध्या ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. तसेच सुके खोबरे ४०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. नारळाबरोबर सुक्या खोबऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २०० रुपयांना मिळणाऱ्या खोबऱ्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.