हिवाळ्याची चाहूल लागताच बुलढाण्याच्या बाजारपेठेत वाटाण्याच्या शेंगा दाखल झाल्या आहेत; मात्र बाजारात आवक कमी असल्यामुळे या 'हिरव्या मोत्यां'ना अक्षरशः सुकामेव्याचा भाव आला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात सध्या वाटाण्याच्या शेंगा तब्बल १०० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत.
अनेकांना वाटाणे आवडत असले, तरी वाढत्या दरामुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. परिणामी, दर कमी होण्याची प्रतीक्षा ग्राहक करत आहेत. वाटाण्याच्या शेंगांचे अनेक उपयोग आहेत.
बहुतांश भाज्यांमध्ये वाटाणा वापरला जातो, तसेच नुसते उकडून किंवा भेल-समोशातही वाटाण्याची मागणी असते. त्यामुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे. काही कुटुंब वाटाण्याच्या शेंगा उकडून खातात. शेंगांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
वाटाण्यामधील जीवनसत्त्वे
• वाटाणा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वाटाणा प्रथिने आणि फायबर यांचा उत्तम स्रोत आहे. यात प्रमुखत्वाने व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए ही जीवनसत्त्वे तसेच फोलेट आणि मँगनीज ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.
• अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वाटाणा फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात अनेक कुटुंबे वाटाण्याच्या दाण्यांची भाजी करून खातात.
दरवर्षी वाटाण्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ!
• वाटाण्याला सध्या मिळत असलेला १२० रुपये प्रति किलोचा भाव पाहता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटाणा हे उत्तम नगदी पीक ठरू शकते. हिवाळ्याच्या सुरुवातीला हे पीक बाजारात आणल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
• स्थानिक पातळीवर उत्पादन वाढल्यास ग्राहकांना स्वस्त दरात वाटाणा उपलब्ध होईल आणि जिल्ह्याची आर्थिक उलाढालही वाढण्यास मदत होईल.
• कमी सिंचनात येणारे हे पीक असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे वळत चालले असून, त्यामुळे दरवर्षी वाटाण्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे.
मध्य प्रदेशातून आवक
• बुलढाणा जिल्ह्यात सध्या वाटाण्याचे स्थानिक उत्पादन पुरेसे उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेला वाटाणा हा मुख्यतः मध्य प्रदेश राज्यातील रतलाम भागातून आयात केला जात आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या खेड्यातून थोड्या प्रमाणात वाटाणा येत आहे.
• उत्पादन खर्च आणि दलालांची साखळी यामुळे मूळ किंमत वाढून तो ८० रुपये ठोक दराने पोहोचतो. सध्या घाऊक बाजारात वाटाण्याच्या शेंगांचे भाव अधिक आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक दराने शेंगा विकत घ्याव्या लागत आहेत. आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील.
किरकोळ बाजारात १५० रुपयांपर्यंत दर चढण्याचे मुख्य कारण म्हणजे थंडीची सुरुवात आणि बाजारात असलेली कमी आवक होय. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे. - बालू जाधव, भाजीपाला विक्रेते.
