छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा गोणी मार्केट बंद करून कांदा ओपन लिलाव सुरू केला आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१ सप्टेंबर) प्रथमच भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू होणार आहे.
बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा ७ ऑगस्ट रोजी सभापती शेषराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. यावेळी आ. प्रशांत बंब व आ. रमेश बोरनारे यांचीही उपस्थिती होती.
या सभेत शेतकऱ्यांनी हात उंचावून केलेल्या धान्याच्या उघड लिलावाची केलेली मागणी बाजार समितीने मान्य केली होती. त्यानुसार सोमवारपासून ओपन लिलाव पद्धतीने बोली पुकारून व्यापारी लिलावातून शेतमाल, भरड-धान्य खरेदी करणार असल्याचे सभापती शेषराव जाधव यांनी सांगितले.
इतर बाजार समितींचा अभ्यास दौरा
लासूरचे व्यापारी व संचालक मंडळाने इतर नामांकित बाजार समितीच्या खुल्या लिलावाची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास दौरा करण्याची सूचना आ. बंब यांनी केली होती. त्यानुसार विंचूर, चाळीसगाव, लासलगाव, मालेगाव या बाजारपेठेतील उघड धान्याचा प्रत्यक्ष लिलाव अभ्यास दौरा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी लासूर स्टेशन बाजार समितीत सुरू होत आहे.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र