बारामती : खरीप हंगाम २०२५-२६ मधील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत सोयाबीन, मूग व उडीद खरेदी करण्याकरिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासनाने कळवलेले आहे.
त्यानुसार, दि. ३० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या मुदतीत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. स्वच्छ सर्वसाधारण दर्जाच्या शेतमालाची हमीदराने विक्रीची सोय व्हावी म्हणून शासनाकडे मागणी केली होती.
खरेदी आधारभूत केंद्राकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असल्याने दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले.
खरेदी केंद्रावर नाफेडमार्फत सोयाबीन प्रति क्विंटल ५,३२८, उडीद ७,८०० आणि मूग ८,७६८ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत दरानुसार हमीदराने शासन खरेदी करणार असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची असल्याने नोंदणीकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
◼️ शेतकऱ्याचे आधारकार्ड
◼️ आधार लिंक मोबाईल नंबर
◼️ सन २०२५-२६ चा डिजिटल नोंद असलेला ७/१२ उतारा
◼️ पीकपेरा
◼️ बँकेचे पासबुक आयएफएससी कोडसह (आधार व मोबाईल नंबर लिंक असलेले) झेरॉक्स इत्यादी.
शासनाने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल सहकारी खरेदी-विक्री संघात ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. दि. १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील ९० दिवसांसाठी खरेदी करण्यात येणार आहे.
बारामती मुख्य बाजार आवारातील यांत्रिक चाळणी येथे ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग व उडीद या शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी मुदतीत केली जाणार आहे.
अधिक वाचा: सीमेपलीकडे कर्नाटकातील 'हा' साखर कारखाना उसाला देतोय तब्बल ४,३३९ रुपये दर; वाचा सविस्तर
