Join us

कन्नड बाजार समितीत कांदा बिजवाई खरेदीला सुरुवात; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:25 IST

Onion Seed Market : गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या लिलावात कांदा बियाणास प्रति क्विंटल ४१ हजार रुपयांचा भाव मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमीच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना अधिक दरवाढीची प्रतीक्षा लागली आहे.

प्रविण जंजाळ 

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या लिलावात कांदा बियाणास प्रति क्विंटल ४१ हजार रुपयांचा भाव मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमीच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना अधिक दरवाढीची प्रतीक्षा लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या दुकानात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांच्या हस्ते वजनकाटा पूजन करून कांदा बियाणे खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जैतखेडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर राठोड व लंगडातांडा येथील शेतकरी शिवाजी चव्हाण यांनी कांदा बियाणे विक्रीसाठी आणले होते.

यावेळी झालेल्या लिलावात गराडा येथील व्यापारी प्रकाश चव्हाण यांनी ४१ हजार रुपये प्रतिक्विंटलची बोली लावून कांदा बियाणांची खरेदी केली. यावेळी सागर चव्हाण, भरत राठोड, मधुकर राठोड, अशोक चव्हाण, विलास राठोड, संजय चव्हाण, जगन चव्हाण, राहुल वाघ, मनोज चव्हाण आदींची उपस्थिती होती.

दोन ते साडेतीन किलो कांदा बियाणांमध्ये होते एकरभर कांदा लागवड

• लागवड हाताने किंवा खास डिझाइन केलेल्या लावणी यंत्राने कांदा बियांची लागवड केली जाते. रोपांची घनता प्रति हेक्टर ६ लाख ते ८ लाख रोपांपर्यंत असू शकते.

• बियाण्याची संख्या साधारणपणे प्रति किलो २७ लाख बियाण्यांइतकी असते.

• ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी २ किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये ३.५ किलो बियाणे लागते.

गतवर्षी ६५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाला होता दर

• मागील वर्षीच्या प्रारंभी कांदा बियाणास ३५ हजार १०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. पुढे त्यात वाढ होऊन ६५ हजार हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला होता.

• त्यानंतर खरेदीच्या अंतिम टप्प्यात दरात कमालीची घसरण होऊन ४० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढील काळात दरवाढीची अपेक्षा आहे. मागील वर्षी २०० क्विंटल कांदा बियाणांची कन्नडच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती.

हेही वाचा : लोकसंख्येसोबत दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योगात आहेत मोठ्या संधी; वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारमराठवाडाछत्रपती संभाजीनगर